आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:कथाकथन अन् विनोदी लेखनातून कित्येक दशके मराठी वाचकांना भुरळ पाडणारी मिरासदारी कायमची विसावली

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थिप्रिय अध्यापक, प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांचे निधन
  • विनोदी साहित्यातील अजातशत्रू, मायाळू माणूस गमावला ​​​​​​​

ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, पटकथा-संवादलेखक आणि मराठीचे विद्यार्थिप्रिय अध्यापक प्रा. द. मा. मिरासदार (९४ ) यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी हे त्यांचे जावई होत. प्रा. मिरासदार यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना नुकतीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मात्र, राहत्या घरी शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. “दमा’ आणि “दादासाहेब’ म्हणून ओळखले जाणारे मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ रोजी झाला. सुरुवातीला अल्पकाळ त्यांनी पत्रकारिता केली. पुढे १९८०च्या दशकात त्यांनी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात आणि नंतर पुण्यात गरवारे महाविद्यालयात मराठीचे अध्यापक म्हणून कारकीर्द गाजवली. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत.

प्रा. मिलिंद जोशी
पिकलेले पान अलगद गळून पडावे तसे मिरासदार गेले. त्यांच्या जाण्याने वडीलधारा मायाळू माणूस साहित्य विश्वाने गमावला. ते अंतर्बाह्य निर्मळ आणि सच्चा माणूस होते. अजातशत्रू होते. साहित्य संस्थांशी विशेषत: महाराष्ट्र साहित्य परिषदेशी त्यांचा अखेरच्या श्वासापर्यंत स्नेह होता. भिन्न राजकीय विचारधारा असणाऱ्या लोकांचा त्यांनी कधी दुस्वास केला नाही.

शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द.मा. मिरासदार, रा. रं. बोराडे ही मंडळी लिहायला लागली त्या वेळेपर्यंत मराठीतला विनोद हा मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि पांढरपेशा लोकांच्या जीवनातील घडामोडींशी निगडित होता. काही प्रमाणात प्रसंगनिष्ठ होता. या मंडळींनी ग्रामीण जीवनातल्या गमतीजमती, तिथल्या माणसांचे स्वभाव, त्या माणसांच्या भाबडेपणातून घडणारे विनोद प्रामुख्याने मराठी कथांमध्ये आणले. मराठी साहित्याचे विनोदाचे वर्तुळ व्यापक करण्याचा प्रयत्न या पिढीने केला. माडगूळकरांनी दुःख, दारिद्य्र असतानाही प्रचंड सोशिकतेने जीवनाला सामोरे जाणाऱ्या माणसांचे जग त्यांच्या साहित्यातून उभे केले. दमांनी हास्यकथेच्या माध्यमातून ग्रामीण कथेला पुढे नेले.

देशात आणि परदेशात कथाकथनाच्या माध्यमातून ग्रामीण कथा विशेषतः विनोदी कथा लोकप्रिय करण्याचे श्रेय दमा, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील या त्रिमूर्तीकडे जाते. अध्यापन क्षेत्रात रमलेल्या दमांनी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. विनोदी लेखकाला त्याच्या विनोदाचे नाणे पाडता आले पाहिजे, असे म्हणणाऱ्या मिरासदारांनी विनोदी साहित्याच्या क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाचा स्वतंत्र अध्याय निर्माण केला. वयाच्या ९५ व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. अशात कानाने कमी ऐकायला येत होते त्यावरही ‘सध्या मी सर्पयोनीत आहे’ असं ते मिश्कीलपणे म्हणत. या जगातलं दुःख नाहीसं करता येत नाही पण ते हलकं करण्याची ताकद विनोदात आहे यावर अढळ श्रद्धा असणारा हा जिंदादिल साहित्यिक आनंदयात्री होता. कारण त्यांनी मराठी लोकांना खळखळून हसवले आणि भरभरून आनंद दिला. स्वतःही तो आनंद घेतला.त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यातली मिरासदारी गेली आहे.

पत्रकारिता, प्राध्यापक ते लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही
विद्यार्थीप्रिय अध्यापक असा त्यांचा लौकिक होता. अध्यापक होण्याआधीपासूनच त्यांच्या लेखनाला प्रारंभ झाला होता. १९५०च्या सुमारास “सत्यकथा’ मासिकात आलेल्या त्यांच्या “रानमाणूस’ या सुरवातीच्या कथेने वाचकांसह जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. मिरासदार यांनी चित्रपटसृष्टीत पटकथा संवाद लेखक म्हणूनही मोजके काम केले. कथाकथनकार अशी सार्थ उपाधीही त्यांनी मिळवली होती.

  • परळी वैजनाथ येथे १९९८ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
  • माझ्या बापाची पेंड आणि विरंगुळा या त्यांच्या कथासंग्रहांना सर्वोत्कृष्ट साहित्याचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते
  • एक डाव भुताचा, ईर्षा, गोष्ट धमाल नाम्याची या चित्रपटांच्या पटकथा आणि संवादलेखनासाठीही त्यांना पुरस्कार मिळाले होते
  • एकूण २४ कथासंग्रह, सोनियाचा दिवस ही कादंबरी, कुमारांसाठी सुट्टी आणि इतर कथा आणि गाणारा मुलुख या नाटिका, सरमिसळ, गप्पांगण, बेंडबाजा, खडे ओरखडे हे विनोदी लेखसंग्रह
  • राज्यभरात, देशात आणि विदेशांत अनेक ठिकाणी कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम गाजले.
  • व्यंकूची शिकवणी या गाजलेल्या कथेवर गुरूकृपा हा चित्रपट आला होता.
बातम्या आणखी आहेत...