आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंचल्यांची जादू आता पुन्हा नाही:ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन, पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे अल्प आजाराने आज दुपारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे परांजपे यांना ३० मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. परांजपे यांचे पार्थिव दुपारी मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी परांजपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

परांजपे यांची भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून ओळख आहे. त्यांनी वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रातही चांगले काम केले. आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मितीमध्ये त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा, प्रज्ञेचा व अभ्यासपूर्ण चिंतनाचा प्रत्यय दिसून येतो.

रवी परांजपे यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935 बेळगाव येथे झाला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते जाहिरातींसाठी इल्युजन काम करायचे. रवी परांजपे यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे ‘शिखरे रंग-रेषांची’ हे पुस्तक गाजले. ‘नीलधवल ध्वजाखाली’ हे लेखसंग्रहावर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे.

पुरस्कारने त्यांचा गौरव

परांजपे यांना ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड’चा (कॅग) ‘हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दयावती मोदी प्रतिष्ठानतर्फे दयावती मोदी हा कला क्षेत्रातील पुरस्कार लाभला होता. तसेच ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर, ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता.

बातम्या आणखी आहेत...