आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:‘पुस्तकांचं गाव’ वाचनप्रेमींच्या प्रतिसादाने घेतंय उभारी, कोरोनाच्या नियमांचे पालन; वाचकांचाही वाढता प्रतिसाद

जयश्री बोकील | पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भिलारमध्ये पुस्तकांची 22 दालने सुरू, वाचकांचाही वाढता प्रतिसाद

कोरोना महासंसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला लाॅकडाऊनचा काळ आणि नंतरचे भीतीचे वातावरण यावर मात करत ‘पुस्तकांच्या गावाने - भिलारने उभारी घेतली आहे. पुस्तकांचे गाव या प्रकल्पात असणाऱ्या सुमारे ३० ग्रंथदालनांपैकी २२ दालने सुरू झाली आहेत. या ग्रंथदालनांना हळूहळू वाचनप्रेमींचा प्रतिसादही मिळू लागला आहे. तसेच जी ग्रंथदालने लाॅजिंग सुविधेशी जोडलेली आहेत त्यांनाही वाचक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाविषयीची सर्व काळजी आणि नियम काटेकोरपणे पाळून पुस्तकांचं गाव आता उभारी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

मार्च २०२० पासून कोरोना महासंसर्ग संकटामुळे पुस्तकांचे गाव आणि त्यातील ग्रंथदालनेही बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनचा काळ वेळोवेळी वाढवण्यात आल्याने अनेक महिने भिलार येथील पुस्तकांचे गाव वाचनप्रेमींना ‘मिस’ करत होते. या गावातील एकूण ३५ ग्रंथदालनांपैकी मंदिराशी आणि शाळेशी जोडलेली ग्रंथदालने वगळता उर्वरित २२ ग्रंथदालने वाचकांच्या स्वागतासाठी सिद्ध आहेत, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. धीम्या गतीने का होईना पुस्तकांच्या गावात पर्यटक येऊ लागले आहेत. वाचनप्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे ही आमच्यासाठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे, असे पाटील यांनी सांगितले. मंदिरे आणि शाळा अद्याप बंद असल्याने त्यांच्याशी संबंधित काही ग्रंथदालने अद्याप सुरू झालेली नाहीत, पण अन्य दालनांना वाचक चांगला प्रतिसाद देत आहेत. कोरोना काळातही भिलार येथील कार्यालय नियमित सुरू ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे वाचनप्रेमी इथे येऊ शकत नव्हते अशा काळात ज्या घरांतून ग्रंथदालने साकारली आहेत त्या घरातील मंडळींनी वाचनाचा यज्ञ सुरू ठेवला होता. आम्ही मागोवा घेतला तेव्हा सुमारे चारशे नवीन वाचक गावातच ग्रंथदालनांशी जोडले गेल्याचे लक्षात आले, असे भिलार कार्यालयातील पदाधिकारी विनय मावळणकर यांनी सांगितले.

वाचकांचा वाढता प्रतिसाद उत्साह वाढवणारा

भिलार येथील पुस्तकांच्या गावाचा हा प्रकल्प अधिक प्रभावी कसा करता येईल यावर विचार सुरू आहे. विविध प्रकारचे भाषिक उपक्रम कसे वाढवता येतील, त्यासाठी नवी साधने कशी उपलब्ध करता येतील, निवास व्यवस्था वाढवता येईल का..अशा अनेक मुद्द्यांवर सध्या काम सुरू आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर त्याविषयी कृती केली जाईल. मात्र वाचकांचा वाढता प्रतिसाद आमचा उत्साह, ऊर्जा वाढवणारा आहे यात शंका नाही. - संजय पाटील, संचालक, राज्य मराठी विकास संस्था.

बातम्या आणखी आहेत...