आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंदाज:ज्वालामुखीचा उद्रेकही आता भारतीय मान्सूनविषयी ‘बोलणार काही’, भारतीय व जर्मन संशोधकांचा शोध

पुणे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्रेकाचा अंदाज सध्या शक्य नाही, संशोधकांनुसार मान्सूनचा अंदाज वर्तवण्यास साहाय्य मिळू शकते

भारतीय उपखंडातील मान्सूनचा अंदाज हा हवामानशास्त्रातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण घटक मानला जातो. आजवर मान्सूनच्या अंदाजाची अनेक मॉड्यूल संशोधकांनी निर्माण केली. मान्सूनवर परिणाम करणारे अनेक घटक या संशोधनातून समोर आले. या पार्श्वभूमीवर, नुकतेच भारतीय आणि जर्मन संशोधकांनी भारतीय मान्सूनविषयीचे ताजे संशोधन समोर आणले आहे. त्यानुसार, ज्वालामुखीचा उद्रेकही आता भारतीय मान्सूनविषयी महत्त्वाचे ‘बोलणार आहे.’

या संशोधनानुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर वातावरणात विविध वायू आणि धूलिकणांचे आवरण पसरते. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापविणाऱ्या सूर्यकिरणांपासून पृथ्वीचे (त्या विशिष्ट परिसराचे) रक्षण होते, हे सिद्ध झाले आहे. उद्रेकातून पसरणारे हे आच्छादन मानवनिर्मित हरितवायू उत्सर्जनामुळे होणाऱ्या जागतिक तापमानवाढीला रोखून धरू शकते आणि त्याचा परिणाम मान्सूनवर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या ‘अल निनो’वर होऊ शकतो, असे भारतीय आणि जर्मन संशोधकांनी या ताज्या संशोधनात म्हटले आहे. ज्वालामुखीचा उद्रेक नेमका कधी होणार, याचा अंदाज सध्या तरी शक्य नसला तरीही या उद्रेकामुळे मान्सूनचा अंदाज वर्तवण्यास साह्य मिळू शकते, असे संशोधकांच्या चमूने नमूद केले आहे.

यासाठी उद्रेकानंतरची वातावरणातील विविध वायू, धूलिकणांची निरीक्षणे, जगभरातील हवामानशास्त्र संस्थांची निरीक्षणे, नोंदी, संगणकाच्या साह्याने गोळा केलेल्या डाटाचे विश्लेषण, त्यासाठीची विविध मॉडेल्स, प्राचीन अवशेष, झाडांचे अवशेष, प्रवाळ, प्राचीन गुहांमधील अवशेष, बर्फात गाडले गेलेले अवशेष, अशा कित्येक घटकांच्या एकत्रित विश्लेषणातून भारतीय मान्सूनवर अल निनो सर्वाधिक प्रभाव करतो आणि ज्वालामुखीचा उद्रेक अल निनोवर परिणाम करतो, या निष्कर्षाप्रत हे संशोधक पोहोचले आहेत. त्यामुळे इथून पुढे अल निनोवर परिणाम करणारा ज्वालामुखीचा उद्रेक हवामानशास्त्रज्ञांच्या पटलावर प्राधान्याने राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नवे संशोधन मान्सूच्या अंदाजासाठी महत्त्वाचे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथील सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्चचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णन म्हणाले, “उद्रेकानंतर वातावरणातील अडविल्या गेलेल्या सूर्यकिरणांमुळे, उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील हवामानशास्त्रीय घटकांवर परिणाम होतो. त्यात मान्सूनवर परिणाम करणाऱ्या अल निनो आणि ला निना या दोन्ही प्रवाहांचा समावेश आहे. अल निनो आणि ला निना हे उष्म व थंड पाण्याचे समुद्री प्रवाह भारतीय मान्सूनवर परिणाम करतात. विशेषत: गेल्या दहा वर्षांत भारतीय मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. कमी दिवसांत जास्त पाऊस, पावसाचे दीर्घ खंड, पावसाने सरासरी न गाठणे किंवा मोजक्या काळात सरासरी ओलांडून जाणे...असे प्रकार सातत्याने घडत आहेत आणि मान्सूनचा अंदाज नेमकेपणाने वर्तवण्यात काही आव्हाने उभी करत आहेत. नवे संशोधन मान्सूनच्या नेमक्या अंदाजासाठी महत्त्वाचे ठरेल.”

बातम्या आणखी आहेत...