आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापायी चालत असताना अचानक रस्त्यावर खाली पडल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी एका इसमाला दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अज्ञात चोरट्याने मयत रुग्णाच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी चोरुन नेल्याची घटना २५ मार्चला वानवडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये घडली होती. याप्रकरणी संबंधित रुग्णालयातील वॉडबॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
मारुती किसन भालेराव (वय- ३६, रा. आझादनगर, वानवडी,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक चंदू परदेशी (वय- ६० रा. वैदूवाडी, हडपसर,पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दीपक परदेशी यांचे भाउ आकाश परदेशी हे २५ मार्चला वानवडीतील जगतापनगर परिसरातून पायी चालत जात असताना चक्कर आल्यामुळे ते रस्त्यावर खाली पडले. त्यामुळे नागरिकांनी आकाश परदेशी यांना तात्काळ रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर दीपक हे रुग्णालयात पोहोचले त्यावेळी त्यांनी आकाशच्या गळ्यात सोन्याची चेन पाहिली होती. त्यानंतर डॉक्टरांना माहिती देईपर्यत मयत आकाशच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. मात्र, भावाचा अंत्यविधी करावयाचा असल्यामुळे दीपक यांनी लगेच याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली नाही.
आकाश परदेशी यांचा अंत्यविधी उरकल्यानंतर २८ मार्चला दीपक परदेशी यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करुन वॉर्डबॉय मारुती भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.