आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:डोंगरावरून दुर्बिणीतून सामना पाहत घेतला सट्टा, पुण्यात सट्टा घेणारे 33 बुकी जेरबंद

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत विरुध्द इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट सामना सध्या पुणे जिल्ह्यातील गहुंजे स्टेडियम येथे सुरू आहे. या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकींवर पिंपरी-चिंचवड पाेलिसांनी धडक कारवाई करत ३३ जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून ७४ माेबाईल फाेन, आठ कॅमेरे,तीन लॅपटॉप, एक आयपॅड, चार प्रिंटर व एक लाख ३६ हजार रुपयांची राेकड आणि २८ हजार ८०० रुपयांच्या परदेशी नाेटा असा एकूण ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आरोपी हे स्टेडियमजवळील इमारत, डोंगरावर जाऊन दुर्बीण आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने सामना पाहून सट्टा लावत होते.

गहुंजे स्टेडियम येथे भारत आणि इंग्लंड संघादरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सामन्यांवर देश आणि परदेशातील बुकी सट्टा घेत असल्याची माहिती पिंपरी पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी शुक्रवारी रात्री स्टेडियमशेजारील एक उंच इमारत व लेमन ट्री हाॅटेल आणि स्टेडियम परिसरातील डाेंगर या तीन ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करत बुकींना ताब्यात घेतले. या कारवाईत हरियाणातील १३, महाराष्ट्रातील ११, मध्यप्रदेशातील पाच, गाेवा आणि राजस्थानातील प्रत्येकी दाेन व उत्तरप्रदेशातील एक अशा एकूण ३३ बुकींना अटक करण्यात आली.

सहा सेकंदांचा मिळतो बुकींना फायदा
प्रत्यक्ष स्टेडियमवर खेळला जाणारा सामना आणि प्रसारित होणारा सामना यात ५ ते ६ सेकंदाची तफावत असते. त्याची मदत घेऊन बुकी ग्राहकांकडून चौकार, षटकार, विकेट, रन यावर सट्टा घेत असतात. संबंधित बुकी विविध राज्यातून विमान आणि कारने गंहुजे स्टेडियम परिसरात आले होते. कोरोनामुळे क्रिकेट सामन्याला प्रेक्षक बंदी असल्याने संबंधित बुकी हे स्टेडियम जवळील इमारत, डोंगर येथून दुर्बीण आणि कॅमेऱ्याच्या साह्याने सामना पाहत होते. भोपाळ आणि नागपूर येथे बसून मुख्य बुकी सट्टा घेत होते. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...