आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवलेंचा दावा:मुंबईत आम्हाला मनसेची गरज नाही; भाजप, आरपीआय शिंदे गटाचे 150 नगरसेवक निवडून येतील

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत भाजपा, आरपीआय व शिंदे गटाचे मिळून 150 हून अधिक नगरसेवक निवडून येऊ शकतात. त्यामुळे आम्हाला मनसेची गरज नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (11 सप्टेंबर) स्पष्ट केले.

पत्रकार परिषेदेत केले वक्तव्य

लोणावळ्यात आरपीआय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेत आठवले यांनी बैठकीतील ठरावांसह विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. मुंबईत आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत या खेपेला भाजपा, आरपीआय व शिंदे गट सत्ता स्थापन करणार यात शंका नाही. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून उपमहापौर आरपीआयला मिळावे, असा ठराव आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला आहे.

शिंदे सरकार चांगले काम करत आहे

राज्यात फडणवीस व शिंदे सरकार चांगले काम करत आहे. ओला दुष्काळ त्यांनी जाहीर केला असून केंद्राच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान योजना घोषित करत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम ते करत आहेत. सर्वसामान्यांसाठी सरकार काम करत आहे, अशी स्तुतीसुमनेही त्यांनी उधळली.

भाजपा आरपीआयची आघाडी; मनसेने करू नये बिघाडी

भाजपा, आरपीआय, शिंदे गटात मनसेची एंट्री होणार का, यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, भाजपा व आरपीआयची आहे आघाडी, मनसेने यामध्ये करु नये बिघाडी. मुंबईत भाजपा, आरपीआय व शिंदे गटाचे मिळून 150 हून अधिक नगरसेवक निवडून येतील, अशी शक्यता असल्याने मनसेची आम्हाला आवश्यकता नाही. भाजपानेदेखील मनसेसोबत युती करु नये, ही आमची भूमिका असल्याचे सांगत आठवले म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेसोबत आघाडी करण्याचा विचार नसल्याचे म्हटले आहे. मनसेच्या मराठीच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असला, तरी उत्तर भारतीय व अन्य भाषिक नागरिकांबाबत त्यांच्या असलेल्या भूमिकेला आमचा विरोध आहे. भाजपाने मनसेसोबत युती केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम देशभरात होईल. ते भाजपाला परवडणारे नाही, असे आठवले म्हणाले.

पुण्याचे महापौर व मुंबईचे उपमहापौरपद आरपीआयला मिळावे

पुण्याचे महापौरपद शेड्युल कास्टसाठी आरक्षित झाल्यास पुण्याचे महापौरपद तसेच मुंबईचे उपमहापौरपद आरपीआयला मिळावे, ही आमची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. महागाईवर बोलताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हाच आमचा प्रयत्न असून केंद्राप्रमाणे राज्यानेदेखील काही निर्णय घेतल्यास महागाईवर नियंत्रण आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...