आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Why Is The Honor Of The First Procession Through Lakshmi Street Reserved For Certain Circles? Petition In Bombay High Court Alleging Violation Of Freedom Of Communication

मुक्त संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन:पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मिरवणुकीचा मान विशिष्ट मंडळांनाच का? मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी पुण्यातील लक्ष्मी मार्गावरून प्रथम मानाचे 5 गणपती मंडळच जातील या कथित नियमामुळे इतर गणेश मंडळांच्या मुक्त संचाराच्या घटनादत्त अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप एका याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. 'गणेश विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील व त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. याविषयी इतर लहान गणेश मंडळांवर टाकण्यात येणारी बंधने बेकायदा तथा संविधानातील कलम 19 अंतर्गत नमूद मुक्त संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे', असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

गणपती उत्सव पुढील काही दिवसात सुरु होणार आहे आणि अशातच पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी उफाळून येणारा भेदभावाचा व पोलिसी निर्णयातील विषमतेचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देते, अनेकदा व दरवर्षी विनंत्या करूनही पोलीस ऐकून घेत नाहीत तर पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांच्याद्वारे इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते, मानाचे गणपती मिरवणुक पूर्ण करायला खूप वेळ लावतात, मागून येणाऱ्या लहान गणपती मंडळांवर पोलीस गुन्हे दाखल करतात अशा व्यथा याचिकेतून मांडल्याचे याचिकाकर्ते शैलेश बढाई म्हणाले व त्यांना अनेक लहान लहान गणपती मंडळांचा पाठींबा असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त पुणे यांच्यासह पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती. केसरीवाडा गणपती यांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. अजिंक्य उडाणे, अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. तृणाल टोणपे व अ‍ॅड. अक्षय देसाई यांनी दिली. मानाच्या या पाच गणपती मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी प्राधान्य दिले जाते “कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार या पाच मंडळांना हा प्रथम मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे अशी विचारणा संजय बालगुडे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार पोलीस आयुक्त कार्यालयाला विचारली तेव्हा याबाबत कोणताही लेखी कायदा किंवा नियम नसल्याचे कळविण्यात आल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलेला आहे.

मानाच्या गणपतींच्या आधी ज्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढायची असेल त्यांना पोलीस आयुक्तांनी परवानगी द्यावी व तशी सोय उपलब्ध करून द्यावी, मानाच्या गणपती मंडळांनी किती वेळात विसर्जन मिरवणूक पूर्ण करावी याबाबत स्पष्ट वेळ मर्यादा घालून द्यावी, जी मंडळे पहिली येतील त्यांनी पहिले लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढावी, अशी संमती मानाच्या पाच गणपती मंडळांनी द्यावी, असे आदेश न्यायालयाने देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...