आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच प्रिव्ह्यू:विजयी हॅट‌्ट्रिकने निश्चित होणार हैदराबाद टीमचा प्लेऑफ प्रवेश!,  हैदराबाद-कोलकाता सामना; प्रक्षेपण सायं. 7.30 वाजेपासून

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलियम्सनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघ आता आयपीएलमधील प्लेऑफ प्रवेश निश्चित करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी हैदराबाद संघाला आगामी तिन्ही सामन्यांमध्ये विजयी हॅट‌्ट्रिक साजरी करावी लागणार आहे. मात्र, यामध्ये हैदराबाद संघासमोर गत उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा अडसर असेल. कोलकाता आणि हैदराबाद हे दोन्ही संघ शनिवारी पुण्याच्या एमसीए मैदानावर समोरासमोर असतील. या दोन्ही संघांच्या नावे प्रत्येकी १० गुण आहेत. मात्र, हैदराबाद संघ गुणतालिकेत सहाव्या आणि कोलकाता सातव्या स्थानावर आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये आयपीएलमध्ये २२ सामने झाले आहेत. यात कोलकाता संघाला १४ सामन्यांत विजयाची नोंद करता आली, तर हैदराबादने ८ सामने जिंकले आहेत. सत्रात कोलकाता व हैदराबाद यांच्यातील हा दुसरा सामना रंगणार आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाने ७ गड्यांनी कोलकात्यावर मात केली होती.

हैदराबाद : पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान; मोठा स्कोअर गरजेचा
यंदा आयपीएलमध्ये संथ सुरुवात करणाऱ्या हैदराबाद संघाला आता पराभवाची मालिका खंडित करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. यातून टीमला प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करता येईल. हैदराबाद संघाने गत चारही सामन्यांत पराभवाची धूळ चाखली आहे. यातून विजयी ट्रॅकवर येण्यासाठी हैदराबादला आता पुण्याच्या मैदानावर मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. याची मदार आघाडीच्या फलंदाजांवर असेल. कर्णधार विलियम्सनला मोठी खेळी करावी लागणार आहे. तसेच मार्कराम, राहुल त्रिपाठी व अभिषेक शर्माही फाॅर्मात आहेत. गोलंदाजीमध्ये उमरान मलिक सध्या फाॅर्मात आहे. त्याने ११ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत.

कोलकाता : सलामीवीरांकडून मोठ्या खेळीची आशा; व्यंकटेश ठरतोय फ्लाॅप
गत उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला आता सलामीवीरांकडून मोठ्या खेळीची आशा आहे. यासाठी सातत्याने कोलकाता संघ या जोडीमध्ये बदल करत आहे. मात्र, टीमला समाधानकारक असे यश मिळाले नाही. कर्णधार श्रेयस अय्यर एकमेव फाॅर्मात अाहे. त्याच्या नावे ३००+ धावांची नोंद आहे. व्यंकटेश अय्यरला अद्याप छाप पाडता आली नाही. आंद्रे रसेल आणि नितीश राणा चांगली खेळी करत आहेत. गोलंदाजीमध्ये उमेश यादव फाॅर्मात आहे. त्याने हैदराबादविरुद्ध चार बळी घेतले होते. आता त्याला याच कामगिरीला उजाळा द्यावा लागणार आहे. त्यामुळे कोलकाता संघाला हैदराबाद टीमच्या मोठ्या धावसंख्येला ब्रेक लावता येईल. अातापर्यंतची उमेश यादवची गोलंदाजी लक्षवेधी ठरलेली आहे. त्याचा निश्चित फायदा टीमला झाला.

बातम्या आणखी आहेत...