आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:सासरच्या सूचनांमुळे दोन आठवड्यांतच आयटी इंजिनिअर सून वैतागली; पोलिसांच्या ‘भरोसा’मुळे टळला काडीमोड

पुणे / मंगेश फल्ले11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्षुल्लक कारणावरून पुण्यातील उच्चशिक्षित नवदांपत्यामध्ये झालेल्या तणावाची कहाणी

सपना आणि संजय. दोघेही आयटी इंजिनिअर. दोघांनाही गलेलठ्ठ पॅकेजची नोकरी. मध्यस्थांमार्फत विवाह जुळला. दोन्हीकडील मंडळींनी थाटामाटात लग्न लावून दिले. सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने रंगवत असतानाच पडला मिठाचा खडा. कारण म्हणावे तर क्षुल्लक, पण दोन आठवड्यांतच सून गेली माहेरी निघून अन् प्रकरण थेट काडीमोड घेण्यापर्यंत गेले. परंतु पोलिसांच्या वेळीच समुपदेशनामुळे तणाव निवळला अन् नवदांपत्याचा संसारही वाचला. एखाद्या वेबसिरीजला शोभेल अशी कहाणी घडली पुण्यात.

सपना आणि संजय दाेघेही (नाव बदलले आहे) यांनी पुण्यातील नामांकित महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या पगारावर आयटी कंपनीत दाेघेही रुजू झाले हाेते. मध्यस्थांमार्फत त्यांचे लग्न जमले. थाटामाटात त्यांचे लग्न पार पडले. मात्र, सासरी तिला सतत सूचनांचा भडिमार सुरू झाला. तिने कसे वागले पाहिजे, फाेनवर अधिक गप्पा मारू नये, घरकामात लक्ष दिले पाहिजे, अशा गाेष्टी सासरच्या मंडळींकडून सांगण्यास सुरुवात झाली. लग्नासाठी आलेली नणंदही सतत सूचना करू लागल्याने सपना मात्र वैतागली. सासरची वागणूक सपनाच्या पचनी पडेना. ऐकले नाही तर सासरच्यांनी मारहाणही केली. अखेर सपनाने हा सर्व प्रकार माहेरी कळवला. सासरची मंडळीही उच्चशिक्षित असूनही हा प्रकार घडल्याने वडिलांनी सपनाला तत्काळ माहेरी बोलावून घेतले.

गैरसमज दूर केल्याने दोन जीवांचे पुन्हा मिलन
लग्नानंतर दोन आठवड्यांतच घटस्फोटापर्यंत प्रकरण गेल्याने पोलिसांनीही प्रकरण गांभीर्याने घेतले. सपनाचा आयटी इंजिनिअर पती नोकरीसाठी बंगळुरूस जाणार होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांना समजावून त्यांचे गैरसमज दूर केले व नवदांपत्याला बंगळुरूलाच संसार सुरू करण्याचा सल्ला दिला. अखेर सपना आणि संजय गेले बंगळुरूला अन् दोन्हीकडील मंडळींनी सुटकेचा नि:श्वास टाकला, अशी माहिती ‘भराेसा’ सेलच्या सहायक पाेलिस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दिली.

रातोरात पोहोचली वडिलांच्या घरी
आपल्या उच्चशिक्षित पोरीला हा जाच सुरू असल्याचे कळताच वडिलांनी सपनाला अक्षरश: रातोरात माहेरी बोलावले. नेसत्या वस्त्रांनिशी तिने घर सोडले. मात्र त्यानंतर दोनच दिवसांत सासरच्या मंडळींना आपली चूक उमगली. सुनेला आणण्याकरिता सगळे पोहाेचले व्याह्यांच्या घरी. पण सपनाला मात्र खात्री नव्हती. तिने थेट पोलिसांच्या ‘भरोसा’ सेलकडे तक्रार केली.

बातम्या आणखी आहेत...