आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता, आईचे कोविड सेंटरबाहेर उपोषण आंदोलन

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशासनाचा दावा; 5 सप्टेंबरला दिला डिस्चार्ज

पुण्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असूनही प्रशासनाचा गलथान कारभार अद्याप सुधारलेला दिसून येत नाही. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका ३३ वर्षीय महिलेला कुटुंबीयांनी शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये २९ ऑगस्ट रोजी दाखल केले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना १५ दिवसांनी या, असे कोविड सेंटरकडून सांगण्यात आले. मुलगी बरी झाली असेल असे समजून तिला घरी घेऊन जाण्याचा उद्देशाने तिची आई रागिणी गमरे या कोविड सेंटरमध्ये गेल्या असता “तुमची मुलगी येथे दाखल नव्हती’ अशी धक्कादायक माहिती देण्यात आल्याने सदर महिलेच्या कुटुंबीयांनी कोविड सेंटरबाहेरच उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनीदेखील त्यांना पाठिंबा देत ते उपोषणाला बसले आहेत.

रागिणी गमरे म्हणाल्या, मुलीला कोरोनाची लक्षणे आढळल्याने सुरुवातीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे बेडची कमतरता असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलीस जंबो कोविड सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहाटे चार वाजता ससून रुग्णालयातून अँब्यूलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. त्याच रात्री मला सेंटरमधून फोन आला की, तुमची मुलगी ऐकत नाही, औषध घेत नाही, त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही रुग्णालयात गेलो असता आता मुलगी ठीक आहे असे सांगत तिचा १५ दिवस क्वॉरंटाइन काळ झाला की तिला घेऊन जा. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे.

माहिती दिली : रुग्णालय :उपचार करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबाला याबाबत फोन करून माहिती दिल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सर्व माहिती मागितली असून तसे पत्र लाइफलाइन एजन्सीला दिले आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबाशी कोविड सेंटरचे नोडल अधिकारी राजेंद्र मुठे चर्चा करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रशासनाचा दावा; 5 सप्टेंबरला दिला डिस्चार्ज
जम्बो कोविड रुग्णालयाचा कारभार पाहणाऱ्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या, जंबो कोविड सेंटरमधून एक महिला बेपत्ता झाल्याचे कुटुंबाकडून समजल्यानंतर याबाबत कोविड सेंटरचे तत्कालीन काम पाहणाऱ्या लाइफलाइन या एजन्सीला विचारणा केली आणि कागदपत्रे मागितली आहेत. लाइफलाइन यांनी बेपत्ता असलेल्या महिलेस कोविड सेंटरमधून ५ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...