आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी समाजाच्या सहकार्याने अत्याचाराच्या घटना रोखाव्यात:नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले मत

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात प्रत्येक वेळी कोर्टात जाण्याची आवश्यकता नसते, तर अहिंसेच्या मार्गाने सुद्धा होणाऱ्या अत्याचरांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. अनेक सामाजिक संस्था महिलांविषयक प्रश्नांसंदर्भात चांगले काम करत आहेत. स्त्री आधार केंद्र गेल्या 35 वर्षांपासून महिलांचे अत्याचार रोखण्यासाठी काम करीत आहे. वेळ लागतो पण न्याय नक्कीच मिळतो, त्यासाठी आपल्याकडे संयम असायला पाहिजे, असे मत स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी मांडले.

67 व्या जागतिक महिला आयोगाच्या चर्चासत्रात ‘सार्वजनिक ठिकाणी छेडछाड रोखण्यात ग्रामीण महिलांचे यश’ या विषयावर रविवारी स्त्री आधार केंद्राने ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

डॉ. गोऱ्हे पुढे बोलताना म्हणाल्या, 'बऱ्याचदा महिला अन्यायाविरोधात आवाज उठवताना खूप विचार करत असतात. आपल्याला कोण काय म्हणेल का? तसेच मैत्रिणींचे ऐकून होणाऱ्या अन्यायावर काही बोलत नाहीत. सहन करत राहतात. यावेळी त्यांनी साहित्यातील रेखाटलेल्या कादंबरीतील ‘पारू’ या स्त्री पात्राचे उदाहरण देऊन महिलांवर होणाऱ्या छळाविषयी सांगितले. तसेच हुंडाबळी सारख्या पद्धतीमुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. ग्रामीण भागातील महिलांनी होणाऱ्या अत्याचारांपासून रोखायचे असेल, त्यामध्ये यश मिळवायचे असेल तर धैर्याने सामोरे जाऊन परिवर्तन करणे गरजेचे आहे. न्यायाविरोधात लढून न्याय जरूर मिळतो, त्यासाठी संयम ठेवावा लागतो. महिला संघटनांनी एकत्र येत महिलांच्या स्थानिक समस्यांना लढा दिला पाहिजे. माध्यमांची भूमिका यामध्ये महत्वाची असून त्याद्वारे समाजात अत्याचाराबाबतची जाणीव करून दिली पाहिजे असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी महिलांचे ॲट्रोसिटी मधील सहभाग याविषयी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षेसाठी शाळा, कॉलेजमध्ये जागरूकतेसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचेही सांगितले.

नवी दिल्ली येथील पोलिस विकास संस्थेचे माजी महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी सांगितले की, आपण शहरात सुरक्षित, स्मार्ट सिटीसंदर्भात बोलते मात्र ग्रामीण भागातील चित्र वेगळे आहे त्यावर काम होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न गंभीर आहेत त्यावर उपाययोजना झाली पाहिजे. तसेच महिलांना आरक्षण मिळाल्यामुळे विविध क्षेत्रात त्यांचा प्रभाव दिसून येत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...