आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामाचा वाढता ताण, बहु-कार्य पद्धती आणि क्रॉस-फंक्शनल कौशल्य, दूरस्थ कार्यपद्धतीचा अवलंब, अल्प वेतन व वेतन कपातीची, नोकरी टिकवण्याची टांगती तलवार यामुळे ८१ टक्के लोकांना 'वर्क-लाईफ बॅलन्स' साधण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील ८१ टक्के कर्मचाऱ्यांची ओढाताण होत असून, त्यातही महिलांचे प्रमाण ५६ टक्के असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या 'एम्पॉवर' आणि 'आयपीसोस', ग्लोबल मार्केट रिसर्च अँड पब्लिक ओपिनियन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नीरजा बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली 'कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य व निरोगीपणाचे प्रमाण' याचे सर्वेक्षण करण्यात आले.
पाच महिने सर्वेक्षण
भारतात प्रमुख शहरातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कराव्या लागणाऱ्या आव्हाने व समस्यांवर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. जवळपास पाच महिने चाललेल्या या सर्वेक्षणात तीन हजारपेक्षा अधिक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचे परीक्षण व अभ्यास करण्यात आला आहे. पुण्यासह भारतातील महत्वाच्या शहरातील दहा क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण झाले आहे.
अहवाल प्रकाशित
या सर्वेक्षणाविषयी 'एम्पॉवर' पुणे सेंटरच्या प्रमुख व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्नेहा आर्या आणि मानसोपचारतज्ज्ञ आणि 'एम्पॉवर'च्या क्लिनिकल ऑपरेशन्स अँड रूरल इनिशिएटिव्हचे सहयोगी उपाध्यक्ष डॉ. अंबरीश धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
वर्क लाईफ समतोलाचा अभाव
डॉ. स्नेहा आर्या म्हणाल्या, समुपदेशनासाठी येणाऱ्या २४ ते ४० वयोगटातील तरुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यातील व्यक्तींसाठी कामाशी संबंधित तणाव आणि वर्क-लाईफ समतोलाचा अभाव ही चिंताजनक बाब बनली आहे. सततचा कामाचा ताण, कामाचे दीर्घ तास आणि नेहमी चालू असलेली कार्यसंस्कृती यामुळे बर्नआउट, चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कामाच्या ठिकाणासह त्यांचे वैयक्तिक व सामाजिक जीवन, नातेसंबंध यावर परिणाम होत आहे. महिला कर्मचाऱ्यांना यामध्ये अधिक त्रास होत आहे.कोरोनाने मानसिक आरोग्य चर्चेत आले. कॉर्पोरेट जगताचे स्पर्धात्मक स्वरूप कर्मचाऱ्यांच्या तणावाच्या पातळीत भर घालत आहे.
असे झाले सर्वेक्षण
पुण्यासह मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, बंगलोर, अहमदाबाद या शहरांतील बँकिंग, आटोमोबाइल, आयटी, हॉस्पिटॅलिटी, ई कॉमर्स, हेल्थकेअर, एज्युकेशन, एफएमसीजी, बीपीओ, ड्युरेबल्स या क्षेत्रात तीन हजार कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण झाले. त्यामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर, अकाउंट मॅनेजर, डायरेक्टर, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, मॅनेजिंग डायरेक्टर, सीईओ आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे पाच महिने चाललेल्या या सर्वेक्षणात नोकरी, कामाचा समतोल, कौटुंबिक आणि नातेसंबंधांत तणाव, आर्थिक अस्थैर्यता याचा अभ्यास करण्यात आला. १६२७ पुरुष, तर १३७३ महिलांचा यात समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.