आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुर्वेद ही एक साधना आहे, हे ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून त्यासाठी अनुभवाचे ज्ञानही महत्वाचे आहे. आयुर्वेदाला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज पुणे येथे केले.
पत्रकार भवन सभागृहात गरुवारी (ता. 2) झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सुभाष रानडे आणि डॉ. सुनंदा रानडे यांना परिवर्तन आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब.मुजुमदार, नॅक राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन, परिवर्तनचे अध्यक्ष डॉ.शैलेश गुजर, सचिव स्वरुपा गुजर आदी उपस्थित होते.
योग जगाला मार्गदर्शक
राज्यपाल म्हणाले, योग आणि आयुर्वेदाचे आपले भारतीय ज्ञान जगाला मार्गदर्शक आहे. हे ज्ञान अनुभवसिद्ध आणि उपयुक्त आहे. आपण आयुर्वेदीक उपचार पद्धतीवर विश्वास ठेवायला हवा. निसर्गाने दिलेल्या या अद्भुत देणगीचा उपयोग रोगोपचारासाठी करायला हवा. आयुर्वेदाच्या अभ्यासकांनी संस्कृत अध्ययनाकडेही लक्ष द्यावे. आयुर्वेदाचे अध्ययन आणि अनुसरण आरोग्यशास्त्रात क्रांती घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपालांकडून डॉ. रानडेंचा गौरव
आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासन सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, अभ्यासकांनी साधनेवर अधिक भर द्यावा. डॉ.रानडे यांनी आयुर्वेदाचे ज्ञान भारताबाहेर पोहोचवून देशाची मोठी सेवा केली आहे. त्यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या कार्यामुळे भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली आहे, अशा शब्दात त्यांनी डॉ. रानडे यांच्या कार्याचा गौरव केला.
आरोग्यसेवेचा प्रयोग करा-डाॅ. मुजुमदार
डॉ. मुजुमदार म्हणाले, यापुढील काळात आरोग्य विज्ञान क्षेत्रात कोणतीही एक शाखा स्वतंत्र ठेवण्यापेक्षा विविध शाखा एकत्र करून रुग्णांना चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयोग करण्याची गरज आहे. कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केल्यास त्याचा ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यास उपयोग होईल.
परदेशात त्यांच्या भाषेत आयुर्वेद समजावून सांगण्याचे कार्य रानडे दाम्पत्याने निष्ठेने केले. आज जागतिक आरोग्य संघटनेने भारतात जामनगर येथे पारंपरिक औषधांचे पाहिले जागतिक केंद्र सुरू करून त्यात 250 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, त्याची पायाभरणी डॉ.रानडे यांनी पुण्यातून केली असल्याचे मत यावेळी डॉ पटवर्धन यांनी व्यक्त केले.जगभरातील व्यक्तींनी भारतात येऊन आयुर्वेद शिकायची इच्छा व्यक्त केल्याने आंतरराष्ट्रीय अकादमी स्थापन केल्याचे डॉ. रानडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.