आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"आजच्या माहितीजालाच्या युगात खात्रीशीर माहिती मिळण्यासाठी 'सृष्टीज्ञान'सारख्या नियतकालिकांची गरज आहे. मराठीतून विज्ञान प्रसारासाठी सोप्या भाषेत विज्ञान-तंत्रज्ञान विषयक लिखाण करणारे लेखक व वाचक घडवावेत," असे मत ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे यांनी रविवारी येथे केले.
शताब्दीकडे वाटचाल करत असलेल्या 'सृष्टीज्ञान' या विज्ञान विषयक नियतकालिकाच्या प्रकाशनाची जबाबदारी विज्ञान भारती या संस्थेने नुकतीच स्वीकारली आहे. त्यानंतर प्रकाशित होत असलेल्या पहिल्या अंकाचे प्रकाशन डॉ. योगेश शौचे यांच्या हस्ते झाले. सदाशिव पेठेतील भारतीय विचार साधना सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मोहन वाणी, विज्ञान भारतीचे डॉ. क. कृ. क्षीरसागर, आर. व्ही. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
डॉ. योगेश शौचे म्हणाले, "तंत्रज्ञानाचा वाढता वापर व बदलती पिढी यामुळे मुद्रित नियतकालिक वाचनाचे प्रमाण काहीसे कमी होत आहे. अशावेळी 'सृष्टीज्ञान' ऑनलाइन स्वरूपातही उपलब्ध करून देता येईल. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सामावून घेतले, तर त्यांच्यातील विज्ञान लेखक व वाचक तयार होतील. त्यासाठी वैज्ञानिक लिखाणावर कार्यशाळा घ्याव्यात,".
डॉ. मोहन वाणी म्हणाले, "मराठीतून विज्ञान प्रसाराचे हाती घेतलेले काम विज्ञान भारती समर्थपणे पुढे नेईल. नव्या शिक्षण धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा पर्याय असल्याने मराठीतून विज्ञान शिकण्याला प्रोत्साहन मिळेल. नियतकालिके, पुस्तके माणसांना समृद्ध करतात. त्यामुळे मराठीतून विज्ञान समजून घ्यावे. ग्रामीण व शहरी भागात वितरण करण्यावर भर द्यावा. विविध विषयांतील विज्ञानाचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न या नियतकालिकातून होईल, असे वाटते."
संपादक रमेश दाते यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. आर. व्ही. कुलकर्णी यांनी विज्ञान भारती संस्थेचा दृष्टीकोन विशद केला. 'सृष्टीज्ञान'च्या आधीच्या संपादकीय मंडळाचा सन्मान यावेळी करण्यात आला. डॉ. प्रमिला लाहोटी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मानसी माळगावकर यांनी आभार मानले.
-----------------------
ज्येष्ठ शास्त्रज्ञांकडून शुभेच्छा
'सृष्टीज्ञान' या नियतकालिकाचे प्रकाशन हक्क विज्ञान भारतीकडे आल्यानंतर प्रकाशित होत असलेल्या पहिल्या अंकाचे औपचारिक प्रकाशन गुढीपाडव्याच्या दिवशी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शेखर मांडे यांच्या हस्ते झाले. या दोन्ही ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी 'सृष्टीज्ञान'च्या या अंकाला शुभेच्छा दिल्या. विज्ञान प्रसाराचे हे कार्य आणखी जोमाने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या अंकासाठी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दोघांनीही दिले.
-----
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.