आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:नोकरी गेल्याने पत्नी, दीडवर्षीय मुलाची हत्या करून तरुणाने केली आत्महत्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हनुमंत शिंदे, प्रज्ञा शिंदे आणि शिवतेज शिंदे - Divya Marathi
हनुमंत शिंदे, प्रज्ञा शिंदे आणि शिवतेज शिंदे
  • पुण्यातील लाेणी काळभोर येथील घटना, मृत सोलापूरचे रहिवासी

लॉकडाऊनमध्ये नाेकरी गेल्याने बेरोजगार तरुणाने पत्नी आणि दीड वर्षाच्या चिमुरड्यावर सुरा फिरवून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील लाेणी काळभोरच्या कदम वाकवस्ती येथे सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हनुमंत दर्याप्पा शिंदे (३८, मूळ गाव बक्षीहिप्परग, ता. दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर), प्रज्ञा हनुमंत शिंदे (२८) आणि शिवतेज (१ वर्ष २ महिने) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी हनुमंतचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. हनुमंत हा पत्नी, तीन मुले आणि वडिलांसह कदम वाकस्ती येथे वास्तव्यास होता. हनुमंत हा सिमेंट टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून कामास होता. त्याची पत्नी प्रज्ञा शिवणकाम करत होती.

लॉकडाऊन लागल्यानंतर हनुमंत हा घरीच होता. आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे पती-पत्नींमध्ये नेहमीच वाद होत होते. दर्याप्पा रविवारी दुपारी १२ वाजता घरी आले. त्या वेळी नातू प्रथमेश व नात ईश्वरी हे हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले होते, तर मुलगा हनुमंत, सून प्रज्ञा व नातू शिवतेज हे जेवन झाल्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. दुपार उलटूनही मुलगा व सून बेडरूममधून बाहेर आले नाहीत त्यामुळे दर्याप्पा यांनी दार वाजवून पाहिले. मात्र, त्यांनी ते उघडले नाही. झोप लागली असल्याचे समजून त्यांनी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा एकदा दरवाजा वाजवला. मात्र, तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दर्याप्पा यांनी भाचा दत्तात्रय मोरे, जावई किसन बाबूराव मोरे व धाकटा मुलगा सोमनाथ शिंदे यांना घरी बोलावून घेतले. या सर्वांनी सुरुवातीला हनुमंत आणि प्रज्ञा यांना आवाज दिला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजा अखेरीस तोडला. त्या वेळी हनुमंत गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळला. प्रज्ञा हिचा पलंगावर मृतदेह होता, तर शिवतेज या चिमुरड्याच्या गळ्यावर सुरीने वार करण्यात आल्याचे त्यांना दिसले. यानंतर पोलिसांना तातडीने याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. दरम्यान, अर्थिक परिस्थिती आणि काम नसल्याने हनुमंत याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती. याप्रकरणी पोलिस हे सर्व बाजुंनी तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...