आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाणू:झिका आजार संसर्गजन्य अन् जीवघेणा नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची माहिती

झिका आजार विषाणूजन्य असला तरी तो संसर्गजन्य, जीवघेणा नाही. या आजाराच्या मृत्यूची एकही नोंद अद्याप आपल्याकडे झालेली नाही. एडिस इजिप्ती हा डास झिकाचा वाहक असतो. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.

राज्यात झिकाचा पहिला रुग्ण ३० जुलै रोजी पुणे जिल्ह्यात आढळला. त्यानंतर झिका आजाराची चर्चा सुरू झाली. विशेषत: कोरोना संसर्ग संकटाची टांगती तलवार असताना या विषाणूजन्य आजाराचा रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये काहीशी भीती आणि धास्ती पसरली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रदीप आवटे यांनी उपरोक्त स्पष्टीकरण केले आहे. झिका हा आजार विषाणूजन्य असला तरी तो प्राणांतिक नाही.

लक्षणे : ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळे लाल होणे
झिकाची लक्षणेही सामान्यत: फ्लूप्रमाणेच असतात. ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे जाणवतात. थकवा येतो. त्यावर पुरेसे पाणी पिणे, भरपूर विश्रांती घेणे आणि तापासाठी क्रोसिन घेतली तरी चालते. अर्थात, वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे, पण घाबरून जाऊ नये, असे डॉ. आवटे म्हणाले. पुरंदर तालुक्यातील झिकाचा रुग्ण असलेली महिला पूर्ण बरी झाली आहे. तिला कोणतीही लक्षणे आता नाहीत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही कुठलाही त्रास नसल्याचे डॉ. आवटे यांनी दै. दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

झिकाचा डास दिवसाच चावतो
गुजरात, केरळ येथे तुरळक प्रमाणात, तर राजस्थान, मध्य प्रदेशात जरा अधिक रुग्णसंख्या (सुमारे दीडशे रुग्ण) झिकाबाधित होते.‘एडिस इजिप्ती’ डासापासून याची उत्पत्ती होते. त्यामुळे आपल्या आसपास, घरात, कार्यालयात डासांची निर्मिती होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. साठवलेल्या पाण्यात, डबक्यात, अस्वच्छ ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. झिका पसरवणारा डास मुख्यत: दिवसा चावत असल्याने काळजी घ्यावी, असेही डॉ. आवटे यांनी या वेळी सांगितले.

केरळमध्ये आढळले १३ रुग्ण
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असून तो १९४७ मध्ये युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ मध्ये युगांडा आणि टांझानिया देशांत हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक झाले आहे.

पाण्यात टेमिफॉसच नको
ताप उद्रेक झालेल्या गावात व आजूबाजूच्या ५ किमी परिसरातील सर्व गावांतील साठवलेल्या पाण्याचे साठे दर आठवड्यातून रिकामे करण्याची कार्यवाही करावी. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. पाणी साठवून ठेवणाऱ्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. घरातील पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात टेमिफॉसचा वापर करू नये.

बातम्या आणखी आहेत...