आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना मदतीचा हात:शिक्षणासाठी मिळणार 10 हजाराची मदत; 15 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीत अनेक जणांचे कुटुंब उध्वस्त झाली. तर काहींचे आई-वडील गेल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. पण, मुलांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे यासाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीपैकी प्रत्येक मुलांना शैक्षणिक खर्चासाठी 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्यात एकूण 1156 पालक गमावलेल्या मुलांचा समावेश आहे. त्या मुलांना अर्ज करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावाने आई-वडील, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी 95 लाखाचा बाल निधी प्राप्त झालेला आहे. त्या निधीतून जसे प्रस्ताव येतील त्यानुसार मुलांना शैक्षणिक खर्चासाठी मदत केली जाणार आहे. मात्र ही मदत एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना शैक्षणिक खर्चासाठी दिले जाणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी केले आहे.

जिल्ह्याला 95 लाखाचा निधी प्राप्त

जिल्ह्याला 95 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र त्या निधीमधून प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी दहा हजाराची मर्यादा घालून दिली आहे.जेवढे प्रस्ताव येतील त्यानुसार निधीचे वाटप होईल. मात्र ही बाल निधी वाटप पहिल्यांदाच होत असल्याने प्रशासनाकडून अर्ज मागवून घेतले जात आहेत. जोपर्यंत निधी संपत नाही तोपर्यंत निधीचे वाटप केले जाणार आहे.

महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडे करा अर्ज

अर्जासोबत बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई-वडील कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुरावा, आई-वडील मृत्यू दाखला (झेरॉक्स प्रत), बालक अथवा बालक पालक संयुक्त राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत बँकेचे पासबुक, बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. पात्र लाभार्थींनी आपले प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया, सोलापूर यांच्याकडे जिल्ह्यातील लाभार्थींनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.

दोन्ही पालक गमावलेले जिल्ह्यात 43 जण

कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या जिल्ह्यात 43 जणांचा समावेश आहे. तर एक पालक गमावल्यामध्ये 629 मुले व523 मुलींचा समावेश आहे. त्यामध्ये आई गमावलेल्यांमध्ये 75 जण तर वडील गमावलेल्यांचे प्रमाण 1034 एवढे आहे. मात्र या सर्वांचा डाटा व त्याचे शिक्षण व बॅक डिटेल प्रशासनाकडे आहे तरी देखील प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत. कोविडमुळे मयत झालेल्या पालकांची संख्या, तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे अक्कलकोट 55, बार्शी 62, करमाळा 126 ,माढा 96, माळशिरस 42, मंगळवेढा 94, मोहोळ 154 ,उत्तरसोलापूर 293,पंढरपूर 123 ,सांगोला 51 ,दक्षिण 56 जणांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...