आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या लष्कर भागात मंगळवारी पाणीपुरवठ्याचा दिवस हाेता. पण वेळ निश्चित नव्हती. अवेळी पाणी आले. आई-वडील कामाला गेलेले. त्यामुळे १० वर्षीय शांतराज हा मित्रांमध्ये खेळायला जाण्याऐवजी पाणी भरायला थांबला. पाण्याला दाब नसल्याने माेटार जाेडायला गेला आणि विजेचा धक्का बसून तडफडून जीव सोडला.
शेजारच्या तरुणांनी काठीने त्याला वेगळे केले. शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शांतराज युवराज तल्लारे (वय १०, रा. कुंभार गल्ली) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव अाहे. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
मुलाचा मृत्यू झाल्याचे कळले अाणि अाई शासकीय रुग्णालयात उभी काेसळली. तिने फाेडलेल्या हंबरड्याने उपस्थितांनाही अश्रू अावरता अाले नाहीत. दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर शांतराज याच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, मृत मुलाच्या कुटुंबियांना ५० हजारांची तातडीची मदत करताना शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे. असा पवित्रा घेतला हाेता. माेची समाजातील मान्यवर अाणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी पालिकेच्या ढिसाळ कारभारानेच मुलाचा जीव घेतल्याचा अाराेप केला.
पाेलिसांनी त्यांची समजूत काढली. परंतु ते एेकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी फिरकलेदेखील नाहीत. नेत्यांच्या मध्यस्थीने शेवटी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात अाले. शांतराजची आई धुणीभांडी करते तर वडील मजूर अाहेत. घरी फक्त दिव्यांग अाजी अाहे.
सावंत, अा. शिंदेंकडून कुटुंबाला अार्थिक मदत
राज्याचे अाराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घटनेची दखल घेऊन तल्लारे कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तातडीची मदत दिली. त्याचा धनादेश प्रा. शिवाजी सावंत यांनी कुटुंबाकडे सुपूर्त केला. आमदार प्रणिती शिंदे यांनीही अंत्यविधीसाठी १० हजार रुपयांची मदत दिली.
नळाला मोटार जोडणे कायदेशीर नाही
लष्कर परिसरात पाण्याला पुरेसा दाब अाहे. परंतु अधिक दाब मिळवण्यासाठी बहुतांश नागरिक नळाला माेटारी लावतात. सर्वांनीच माेटारी जाेडल्या की, मागच्या नळांचा दाब कमी हाेताे. नळांना माेटारी लावणे कायदेशीर नाही. कुंभार गल्लीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी अाहे. ताे एक अपघात अाहे. अशा घटना घडू नयेत म्हणून नागरिकांनीच काळजी घेतली पाहिजे. पाण्याला दाब कमी असेल तर महापालिकेकडे तक्रारी कराव्यात. त्यातील दाेष काढण्याची यंत्रणा तत्परच अाहे.
-व्यंकटेश चाैबे, पाणीपुरवठा अधिकारी, महापालिका
कमी दाबाने पाणी येत असल्याने शांतराज हा नळाला मोटर जोडत होता. तो पाण्याने भिजलेला होता. विजेचा धक्का लागल्याने तो जमीनीवर पडला, डोळे पांढरे झालेले होते. तो तडफडत होता. त्यास धरताना मलाही धक्का लागला. माझ्या भावाच्या मदतीने काठीने त्याला दूर केले. रुग्णालयात दाखल केले, असे शेजारील सुनिल बोलेदुलू यांनी सांगितले.
शहरातील पाणीपुरवठा कधीच सुरळित हाेत नाही. शहरात ३५ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. शहरभर वेळी, अवेळी, अपुरा, कमी दाबानेच पाणीपुरवठा हाेताे. संपूर्ण शहरभर नागरिकांची अाेरड अाहे. त्यामुळे १ लाख ४० हजार नळांपैकी सुमारे ७५ टक्के नळांना विद्युत मोटारी लावून पाणी ओढले जाते. त्यातूनच विजेचा धक्का लागून नागरिकांचे बळी जात अाहेत.
गेल्या वर्षभरातील अशा चार घटना घडल्या. त्यात तीन महिलांचा मृत्यू झाला. या सर्व घटना कामगार वसाहतमधल्या अाहेत. महापालिका प्रशासनाने त्याची अद्याप कुठलीच दखल घेतलेली नाही. पाणीपुरवठा सुरळीत होईल यासाठी काहीच होताना दिसत नाही. पुन्हा पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. दरम्यान, कर्नाटक पाणी पळवत असतानाही प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.