आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाई:दहावी-बारावीच्या परीक्षा, होळी-धुलिवंदन सणाच्या तोंडावर पाणीटंचाई; नागरिक संतापले

सोलापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

औज बंधाऱ्यातील पाणी संपले आणि उजनीतून पाणी येण्यास उशीर झाल्याने शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरात काही भागात चार दिवसांआडऐवजी सहा व सात दिवसांआड म्हणजे आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याची सुरुवात तसेच दहावी व बारावीची सुरू असलेली परीक्षा याशिवाय होळी, धुलिवंदन असे पाण्याची आवश्यकता असलेले उत्सव तोंडावर असताना शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतापले आहेत. बुधवारी हद्दवाढ भागासह अनेक पाण्यासाठी धावपळ सुरू होती. दरम्यान दोन दिवसांत ते सुरळीत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी दिली.

शहरात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असून, नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने प्रशासनाकडे पाण्याबाबत विचारणा होत आहे. बुधवारी शेळगी परिसरातील नागरिक पाण्यासह परिसरातील नागरी प्रश्न घेऊन महापालिकेत आले होते. शहर व हद्दवाढ भागात सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मुरारजी पेठ, अवंतीनगर, निराळे वस्ती, राघवेंद्र नगर, जुळे सोलापूर, नई जिंदगी, सैफुल, स्वामी विवेकानंद नगर आदी भागात सहा ते सात दिवसांआड पाणी येत आहे.

पालकमंत्र्यांचा आयुक्तांना फोन
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने मावळते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. पालकमंत्री भरणे यांनी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी पाणीपुरवठ्याबाबत विचारण केली. पाणीपुरवठ्याबाबत तत्काळ बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्री भरणे यांनी दिले. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत नाही झाल्यास महापालिकेत आंदोलन करू, असा इशारा आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांनी दिली.

उजनीतील पाणी उशिरा पोहोचले
औज बंधाऱ्यात उजनीतून सोडलेले पाणी वेळेत आले नाही. दहा दिवस उशिरा पाणी आल्याने शहरासाठी पाण्याची अडचण निर्माण झाली. उजनीतून आठ हजारऐवजी सहा हजार क्युसेक वेगाने सोडले. त्यामुळे औज बंधारा येथे वेळेत पाणी आले नाही. मंगळवारपासून टाकळी पंप हाऊसमधील पंप पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती उपअभियंता मठपती यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...