आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:दीड वर्षात पळवून नेल्या 114 अल्पवयीन मुली, मुलींचे अपहरण होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी

रमेश पवार | सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी १०१ जणींना घरी पोहोचवले

वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील दीड वर्षात शहरातून ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पालकांनी पोलिसांत केल्या आहेत. त्यातील १०१ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उर्वरित १३ मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरूच आहे. पळवून नेण्यात १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चार दिवसांत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या पाशात ओढून पळवून नेले जाते. त्याची तक्रार पोलिसांत दाखल होते. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. पाेलिसांकडून मुलींचा शोध घेतल्यानंतर बहुतांश घटनांत ती मित्रासोबत पळून गेल्याचे आढळून येते. पोलिस मुलीचा शोध घेऊन, तिला परत घेऊन येतात. संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.

चार महिन्यांत २४ मुलींचे अपहरण, १८ परत

  • सन २०२२ मध्ये ९० अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. त्यातील ८३ मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे. सन २०२३ मध्ये जानेवारी ते एप्रिलपर्यंत २४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून त्यातील १८ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले.
  • ज्या मुली सापडलेल्या नाहीत, त्या केसेस कायम तपासावर ठेवल्या जातात. पोलिस स्टेशनकडून तपास शक्य न झाल्यास, अनैतिक मानवी प्रतिबंध विभागाकडे तपासासाठी केस पाठवली जाते. तपास पूर्ण होईपर्यंत ती केस क्लोज होत नाही.
  • मुलगी १८ वर्षांच्या आतील असेल तर तिच्या स्वत:च्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. तिला निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने, ती स्वत: निघून गेली तरी अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. अपहरणाचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला सात वर्षापर्यंतची शिक्षा होते.

रोज दोन ते तीन महिला बेपत्ता

जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये शहरातील ८५८ महिला बेपत्ता झाल्या. याचाच अर्थ शहरात रोज दोन ते तीन महिला बेपत्ता होत आहेत. बेपत्ता ८५८ पैकी ५४१ महिलांना शोधण्यात यश आले. ३१७ महिलांचा शोध लागायचा आहे. मागील चार महिन्यांत शहरात ११८ महिला निघून गेल्याची नोंद असून त्यातील ७३ महिलांचा शोध लागला.

पालकांचा मैत्रीपूर्ण संवाद गरजेचा

पालकांनी मुले किंवा मुली यांना विश्वासात घेऊन संवाद करणे गरजेचे आहे. वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये मैत्रीपूर्ण वातावरणात ठेवेणे गरजेचे आहे. विजय कबाडे, पोलिस उपायुक्त