आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी श्री वीरतपस्वी आत्मज्योत रथोत्सव यात्रा भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. यामध्ये हजारो भक्तगण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे सुमारे चारशे भक्तांनी एक दिवसाचा उपवास करीत या मिरवणुकीचा १८ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला. होटगी मठात सोमवारी महाप्रसाद खाऊनच उपवास सोडण्यात आला. उत्तर कसबा बाळीवेस येथील बृहन्मठात मध्यरात्री २.१० वाजता श्री वीरतपस्वी आत्मज्योत प्रज्वलन करण्यात आले. यानंतर पहाटे पाच वाजता आत्मज्योत मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
यानंतर ही मिरवणूक चाटी गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, सात रस्ता, सिध्देश्वर साखर करखाना, होटगी आदी मार्गांवरून काढण्यात आली. या मिरवणुकीत या संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मिरवणुकीत पालखी, रथ, पारंपरिक वाद्ये होती. मिरवणुकीदरम्यान काशीपीठाचे जगद्गुरू डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे अनेकांनी आशीर्वाद घेतले. जागाेजागी अनेक भक्तांनी आत्मज्याेत मिरवणुकीचे स्वागत केले.
स्वच्छता दूतांच्या कामाला मदत करताना विद्यार्थिनी. जागोजागी महाप्रसाद वाटप अन् स्वच्छताही बाळीवेस ते हाेटगी मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. हजारो भक्तांकरता जागोजागी चहा, नाश्त्याची सोय करण्यात आली होती. जिल्हा परिषदेजवळील गुरू भेटसमोर मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटप करण्यात आला. अनेकजण लाडू, केळी, चहा, पाणी, सुगंधी दूध, शिरा, उपीट असे खाद्य पदार्थ वाटप करत होते. रस्त्यावर स्वच्छतादूतांनी स्वच्छता ठेवली होती. यांच्या स्वच्छता कार्याला शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठा हातभार लावला. जागोजागी कचरापेटी ठेवण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.