आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना येथील एका विठ्ठलभक्ताने ३ महिन्यांनंतर पुन्हा श्री विठ्ठलचरणी तब्बल २ किलो सोन्याचे दान दिले. याची किंमत साधारण १ कोटी २४ लाख रुपये होत आहे. याच भाविकाने जानेवारी महिन्यात १ कोटी ७८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने देवाला दान दिले होते. एकूण ३ कोटी २० लाख रुपयांचे दागिने या भक्ताने अर्पण केले आहेत.
पंढरीच्या विठ्ठलचरणी १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि मोहिनी एकादशीच्या मुहूर्तावर जालना येथील विठ्ठलभक्ताने श्री विठ्ठलाच्या चरणी सोन्याचे धोतर, कंठी आणि सोन्याचा चंदनाचा हार असे एकूण २ किलो ४ तोळे वजनाचे सोन्याचे दान दिले आहेत. यामध्ये पावणेदोन किलो वजनाचे सोन्याचे धोतर, तसेच नाजूक बनावटीचा चंदनहार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे हे दागिने मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आले. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ते दागिने स्वीकारून देवाच्या चरणी अर्पण केले.
पंढरीचा श्री विठ्ठल हा आजवर गरिबांचा देव म्हणून ओळखला जातो. त्याचा प्रसादही अगदी साखर फुटाणे आणि बत्तासे असा साधा असतो. अशा विठ्ठलचरणी गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे दान आलेले आहे. काही महिन्यांपूर्वी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी कुटुंबीयांनी ११ लाख रुपयांची देणगी दिली होती.
पुष्पहार स्वीकारण्यासही नकार
जालना येथील याच भाविकाने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती करून २६ जानेवारी २०२३ रोजी श्री विठ्ठलास सुमारे ३ किलो वजनाचे १ कोटी ७८ लाख रुपयांचे दागिने दान दिले होते. आणि विशेष म्हणजे या भाविकाने मंदिर समितीचा साधा पुष्पहारसुद्धा स्वीकारला नाही. तसेच नाव गोपनीय ठेवण्याची विनंती केल्याचे मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.