आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सिमेंटच्या इमारतींमुळे अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या चिमण्यांची संख्या आज जागोजागी रोडावली आहे. जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधत आपल्या घराभोवती या चिमण्यांचा गोंगाट पुन्हा एकदा व्हावा, त्यातून आनंद मिळावा म्हणून या चिमण्यांसाठी घरटी बनवण्याच्या कार्यशाळेत येथे विद्यार्थिनींनी दोन हजार घरटी बनवली. चिमणी वाचवा, अशा अक्षरात मोठ्या आकारात त्यांची मांडणी केली. या चिमण्यांनो परत फिरा रे, आपल्या घरचा एक कोपरा चिऊताईसाठी, चारा पाणी ठेवून जिव्हाळा दाखवू यासारखे संदेश असलेले फलक मान्यवरांच्या हस्ते फुग्यांसाह आकाशात सोडण्यात आले. या वेळी मुलींनी एकच जल्लोष केला.
पोलिस आयुक्तालय, एनसीसीएस, पल्ली कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विजयकुमार गुलापल्ली, एनसीसीएसचे भरत छेडा, मुख्याध्यापिका गीता दूल, युवराज मेटे, प्रणिता सामल हे उपस्थित होते. प्रास्ताविक करताना गीता सादूल म्हणाल्या की, जैवविविधतेत प्रत्येक सजीवाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. चिऊताईसाठी घरटी बनवत ते नामशेष होण्यापासून वाचवणे हा उद्देश आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार होणे आवश्यक असून त्यातून भावी पिढी तयार होते. लोकसंख्येच्या प्रमाणात चिमण्यांची संख्या वाढण्यासाठी घराच्या आसपास घरटी ठेवावीत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा कोटा यांनी केले. युवराज मेटे यांनी आभार मानले.
... तो आनंद मिळावा
आज वाढत्या शहरीकरणामुळे वृक्ष व वेली कमी होत चालल्या आहेत. सिमंेटची जंगले उभी राहत आहेत. या स्थितीत एरवी कॉलनीत एखाद्या झाडावर दिसणारे चिमण्यांचे थवेच्या थवे कमी होत चालले आहेत. आज काही शहरांत तर चिमण्या दिसेनाशा झाल्या आहेत. या चिमण्या पुन्हा परताव्यात, त्यांचा गोंगाट कानी पडावा आणि एक निर्भेळ आनंद मिळावा म्हणून सोलापुरात हा उपक्रम राबवण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.