आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी यांनी केली घोषणा:भीमा नदीवर वीस रस्ते, पालखी तळही करणार, पंढरपूरसाठी 1 हजार कोटींचा निधी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर शहरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन नवीन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये शेगाव दुमाला ते गोपाळपूर असा नवीन सिमेंट पूल, शहरात नव्याने २० रस्ते, पालखी तळासाठी स्वतंत्र जागा, नदीघाटाचे सुशोभिकरण यासह इतर कामांचा समावेश असणार आहे. प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून त्याबाबत मंदिर समितीचे अध्यक्ष, वारकरी यांच्या सूचना घेऊन आवश्यक कामांचा समावेश करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांनी बैठक घेऊन विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून १ हजार कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

पंढरपूर शहराची ३ लाख लोकसंख्येची क्षमता असताना वारीच्या निमित्ताने एका वर्षात शहरात ४० लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. वारी काळात वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडतात. पण पुढील काळात गर्दी नियंत्रण करणे, वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आणि शहरात स्वच्छता राखणे यास अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येत असल्याचे शंभरकर म्हणाले.

भाविकांची होणार सोय पंढरपूर शहरात वा दर्शनास जाण्यासाठी जुना दगडी पूल व त्या शेजारी बांधलेला नवीन असे दोन पूल आहेत. यामुळे वारी काळात मोठी कोंडी होते. दर्शन घेऊन बाहेर पडणारे व दर्शनासाठी आतमध्ये जाणारे पुलाचा वापर करतात. शेगाव दुमाला येथून गोपाळपूरला जोडणारा नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे मंदिराकडे जाणारे भाविक या पूलाचा वापर करतील, यामुळे वारकरी आणि भाविकांची सोय होईल.

बातम्या आणखी आहेत...