आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भीमेवर नवीन पुलासह पंढरीत 20 रस्ते होणार ; पंढरपूरासाठी हजार कोटींचा आराखडा : जिल्हाधिकारी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर शहरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन नवीन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये शेगाव दुमाला ते गोपाळपूर असा नवीन सिमेंट पूल, शहरात नव्याने २० रस्ते, पालखी तळासाठी स्वतंत्र जागा, नदी घाटाचे सुशोभीकरण यासह इतर कामांचा समावेश असणार आहे. प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून त्याबाबत मंदिर समितीचे अध्यक्ष, वारकरी यांच्या सूचना घेऊन आवश्यक कामांचा समावेश करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांनी बैठक घेऊन विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून १ हजार कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

पंढरपूर शहरातील रस्त्यांची रूंदी कमी आहे. यामुळे नवीन २० रस्ते करण्यात येणार आहे. वारकऱ्यांना थांबण्यासाठी ६५ एकर सारखे आणखी तीन ठिकाणी नव्याने पालखी तळ निर्माण करण्यात येणार आहेत. नमामि चंद्रभागा प्राधिकरणाच्या वतीने नदीत होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व सांडपाणी प्रक्रिया यासाठी स्वतंत्र निधीची मागणी करण्यात येणार आहे.

वारी काळातील सुविधा आणखी वाढवणार
पंढरपूर शहराची ३ लाख लोकसंख्येची क्षमता असताना वारीच्या निमित्ताने एका वर्षात शहरात ४० लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. वारी काळात वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडतात पण पुढील काळात गर्दी नियंत्रण करणे, वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आणि शहरात स्वच्छता राखणे यास अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

भीमा नदीवर नवीन पूल...
पंढरपूर शहरात वा दर्शनास जाण्यासाठी जुना दगडी पूल व त्या शेजारी बांधलेला नवीन असे दोन पूल आहेत. यामुळे वारी काळात मोठी कोंडी होते. दर्शन घेऊन बाहेर पडणारे व दर्शनासाठी आतमध्ये जाणारे याचा पुलाचा अधिक वापर करतात. यामुळे शेगाव दुमाला येथून गोपाळपूरला जोडणारा नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यामुळे मंदिराकडे जाणारे भाविक या पुलाचा वापर करतील व वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...