आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच, औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
वर्षावर झाली बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 18 वी बैठक सोमवारी (दि. 6) मुंबईत वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीस यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर, वाय एल पी राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
समित्यांसमोर सादरीकरण
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वन क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा. त्यांच्या समस्याकडे लक्ष द्या. वन्य जीवांच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने विचार करा. वनक्षेत्रातील विकास कामांबाबत प्रस्ताव आणताना, त्यांचा सर्व अंगानी विचार करा. वन्यजीव मंडळाच्या सदस्य आणि समित्यांसमोर सादरीकरण केले जावे.
जायकवाडीचे काम होणार
राज्यात आतापर्यंत एकूण 15 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील 8 क्षेत्रांना मागील दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या 12 संवर्धन क्षेत्रांची भर पडली. जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवर्जून निर्देश दिले. सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत उपाययोजना, नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढिच्या सूचना दिल्या.
12 संवर्धन राखीव क्षेत्र
घोषित करण्यात आलेल्या 12 संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी , अलालदारी, नाशिक मधील (चार) कळवण, मुरागड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, रायगड जिल्ह्यातील (दोन) रायगड, रोहा, भोर (पुणे) साताऱ्यातील महादरे फुलपाखरू, कोल्हापूरचे मसाई पठार, नागपूरचे मोगरकसा यांचा समावेश आहे. मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रासह कोलामार्का आणि विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास
राज्यात 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मयुरेश्वर – सुपे , बोर, नवीर बोर, विस्तारित बोर, नरनाळा, लोणार वन्यजीव अभयारण्य, गुगामल राष्ट्रीय उद्यान, येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य, नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य, देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य, यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.