आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागातील १ लाख ८ हजार छाेट्या व्यावसायिकांना ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे स्वीकारण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने क्यूआर काेड प्रणालीची सुविधा दिली. त्याच्या माध्यमातून बँकेत ३८० काेटींच्या वर उलाढाल सुरू झाली. त्याने व्यावसायिकांची पत वाढलीच; कर्ज घेण्यास पात्रही ठरले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाव शिवारापर्यंत डिजिटल व्यवहार वाढले.
बँकेवर प्रशासक नियुक्तीनंतर थकीत कर्जवसुलीसह व्यवहार वाढवण्यासाठी अनेक तंत्रस्नेही व्यवहारांवर भर देण्यात आलेला आहे. गावच्या आठवडे बाजारात मायक्राे एटीएमद्वारे सेवा देऊन बँकेने अनेक छाेट्या खातेदारांना आधुनिक सुविधा पुरवली. त्यासाठी बँकेच्या १२० शाखांमध्ये पाॅस (पाॅइंट आॅफ सेल) मशीन ठेवलेले आहेत. त्यानंतर छाेट्या व्यावसायिकांनाच केंद्रस्थानी ठेवून क्यूआर काेड प्रणाली सुरू करण्यात आली. त्यासाठी छाेट्या व्यावसायिकांची खाती उघडण्यात आली. क्यूआर या प्रणालीत त्यांना सामावून घेतले. ग्राहकाने क्यूआर काेड मोबाइलद्वारे स्कॅन केला की, दुकानदाराच्या मध्यवर्ती बँकेतील खात्यावर पैसे जमा हाेतात. ही सुविधा फक्त राष्ट्रीयीकृत बँकाच देतात. परंतु प्रशासक शैलेश काेतमिरे यांनी विशेष प्रयत्न करून ती जिल्हा बँकेसाठीही मिळवून दिली, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
तीन महिन्यांतच ८३ काेटी : इंटरनेट सेवा सक्षम नसल्याने ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार राेखीनेच हाेतात. परंतु पंढरपूर, माळशिरस, माढा या ऊसपट्ट्यात इंटरनेट सेवा सक्षम आहे. तिथल्या सामान्य शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून आधुनिक अर्थ व्यवहार सुरू झाले. त्यांना साेयीचे म्हणून तालुका बाजारातील व्यापारी क्यूआर काेड प्रणालीत आले. राष्ट्रीयीकृत बँकांकडून ही सुविधा मिळाली. गावपातळीवरील शेतकरी, दूध उत्पादक, बी-बियाणे आणि खत विक्रेते यांना ‘लक्ष्य’ करून जिल्हा बँकेने क्यूआर काेड सुविधा देऊ केली. बँकेचे कर्मचारी दुकानदारांना भेटले, त्यांना डिजिटल व्यवहाराचे महत्त्व सांगितले, त्याने त्यांची पत कशी वाढते. त्यानंतर बँकांकडून कर्जे कशी मिळतात, हेही पटवून दिले. या मोहिमेमुळे १ एप्रिल ते ३० जून २०२२ या तीन महिन्यांतच ८३ काेटी रुपये जिल्हा बँकेतील खात्यांत जमा झाले. जुलैअखेर ही उलाढाल ३८० काेटींची झाल्याचे श्री. देसाई म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.