आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विनानिविदा ४० लाखांचे काम सुरू; मामांचे काम की मामा बनवण्याचे

म. युसुफ शेख | साेलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय विश्रामगृहातील ‘पुष्कराज’ या इमारतीत ४० लाखांची कामे विनानिविदा सुरू झाली. त्यातून ‘व्ही-व्हीआयपी’ सूट बनवण्याचे हे काम असल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीतील जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या ताेंडी सूचनेनुसार हे काम असल्याचेही सांगण्यात येते.

एकूण कामे पाहता, अत्यावश्यक असल्याची बाब कुठेही नाेंद नाही. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर साेलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल भगतसिंग काेश्यारी आले हाेते. त्यांच्यासाठी पुष्कराज इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली होती. त्याच वेळी साधारण ५० हजार रुपयांचा खर्च आला होता. त्याच इमारतीच्या रंगरंगाेटीला पुन्हा ३० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्याला निविदेची भानगड नकाे म्हणून १० लाखांच्या कामाचे तीन तुकडे करण्यात आले.

त्याशिवाय टाइल्स बदलणे, पीआेपी या कामासाठी १० लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. शासकीय विश्रामगृहात अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी खास दालन आहेच. असे असतानाही हा खर्च कशासाठी? तत्कालीन पालकमंत्री मामा सांगितले म्हणून की... मामा बनवण्याचा हा खेळ आहे, असे प्रश्न पडतात. त्याची उत्तरे मात्र अधिकारी देत नाहीत.

निविदा काढली नाही, काम अन् दर्जा पाहून पुढील प्रक्रिया
तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुचवलेल्यानुसार ‘पुष्कराज’ इमारतीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास दालन तयार करण्यात येत आहे. त्याचे नेमके काय काम करायचे हे ठरलेले नव्हते म्हणून त्याची निविदा काढली नाही. काम अन् त्याचा दर्जा बघून पुढील प्रक्रिया हाेईल.'' राजशेखर जेऊरकर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर

१.२५ कोटीच्या इतर कामांसाठी निविदा प्रक्रिया
शासकीय विश्रामगृहातील कामे सुरू झालेली असतानाच, दुसरीकडे त्याच कामांसाठी देखभाल, दुरुस्तीसह रंगरंगोटी, टाइल्स बदलणे, पाइपलाइन, ड्रेनेज लाइन दुरुस्त करणे, बाथरुम दुरुस्ती आदी कामांसाठी सव्वा कोटी रुपयांची कामे सुचवण्यात आली आहेत. त्याची निविदा प्रक्रियाही सुरू झाली. पुन्हा हे काम कशासाठी हेही अनाकलनीय आहे.

बातम्या आणखी आहेत...