आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूचा महापूर!:दोड्डी तांड्यातून 5 हजार लिटर हातभट्टी जप्त; उत्पादन शुल्क विभागाने 3 लाखांचा मुद्देमाल पकडला

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या काळात 5 हजार 165 लिटर हातभट्टी दारू पकडण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावात ही कारवाई करण्यात आली. तसेच 1 टन 110 किलो गूळ पावडरसह 3 लाख 59 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. जिल्ह्यात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हातभट्टी साठवणुकीविरोधात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

नेमके प्रकरण काय?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकास माहितीच्या आधारे दोड्डी तांड्यातील भीमराव काशिनाथ राठोड (वय 42 वर्षे, रा. दोड्डी तांडा, ता. दक्षिण सोलापुर) याच्या राहत्या घरी धाड टाकली. त्याच्याकडे हातभट्टी दारू व गूळ पावडर साठवून ठेवल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी झडती घेतली असता 4 प्लास्टिक बॅरलमध्ये 800 लिटर, 50 लिटर क्षमतेच्या 68 प्लास्टीक कॅनमध्ये 3400 लिटर हातभट्टी दारू, 80 लिटर क्षमतेच्या 12 रबरी ट्यूबमध्ये 960 लिटर हातभट्टी दारू, व 5 प्लास्टीक बाटल्यांमध्ये 5 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 5165 लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला. तसेच हातभट्टी दारु तयार करण्याकरता वापरण्यात येणाऱ्या गूळ पावडरच्या 37 गोण्यातून 1 टन 110 किलो गूळ पावडरसह एक मोटारसायकल (MH04 CX 5127) असा एकूण 3 लाख 59 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीला ठोकल्या बेड्या

आरोपी भीमराव काशिनाथ राठोड यास जागीच अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितिन धार्मिक यांचे नेतृत्वात उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक अ विभाग संभाजी फडतरे, निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांच्यासह त्याच्या टीमने ही कारवाई केली.

पाच महिन्यांत 746 गुन्हे

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षात दिनांक 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या कालावधीत अवैध दारू विरोधात एकूण 746 गुन्हे नोंदविले असून त्यात 681 वारस गुन्हे असून 643 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कालावधीत 20759 लिटर हातभट्टी दारु, 1785 लिटर देशी दारू, 592 लिटर विदेशी दारू, 686 लिटर बीअर, 2632 लिटर परराज्यातील दारु, 6429 लिटर ताडी, हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे 2 लाख 53 हजार लिटर रसायन तसेच 75 वाहनांसह एकूण 1 कोटी 78 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाकडून जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...