आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात चोरी आणि घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. विविध पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल केले आहेत. या नऊ प्रकरणात पावणे नऊ लाख रुपयांची चोरी झाली.
लग्नाला गेले अन् घरफोडी झाली
मुस्लिम पाच्छा पेठ येथील रहिवासी जाकीर हुसेन जैनुद्दीन शहापुरे (वय ५२) हे नातेवाइकांच्या लग्नासाठी अॅचिव्हर्स हॉल येथे गेले होते. अज्ञात चोराने घरातील ३,५०,००० रुपये रोख रक्कम आणि ८० हजार रुपये किमतीचे साेन्याचे गंठण असे एकूण ४,३०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ११ मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. जाकीर हुसेन शहापुरे यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
लॅपटॉप, मोबाइलची चोरी
अज्ञात चोराने घरातील मोबाइल व लॅपटॉपची चोरी केल्याची घटना ११ मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कर्णिक नगर परिसरात घडली. प्रवीण गणेश आरडक (वय २१, रा कर्णिक नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
एसटी प्रवासादरम्यान सव्वालाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी
सिमिनाज सलीम बागवान (वय २९) या पती व मुलांसह बार्शी येथून सोलापूरकडे एसटीने येत हाेत्या. वैराग येथून सीटच्या मागे आणि बाजूला बसलेल्या अज्ञात चार महिलांनी पर्समधील १,२५,००० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना ११ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सिमिनाज बागवान यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चार महिलांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
लॅपटॉप, पैसे चोरीला
गोंधळे वस्ती ते हिरामोती रोडवर पर्ल आइस्क्रिम अॅन्ड स्नॅक्स नावाचे पत्राशेड दुकान आहे. अज्ञात चोराने या दुकानाचे पत्रा शेड वाकवून दुकानातील २० हजार रोख रक्कम, लॅपटॉप, चार्जर, असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १० ते ११ मे दरम्यान घडली. याबाबत नरेश विजय महेशन (वय ४४, रा. युनिक टाऊन) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
प्रवासादरम्यान झाली चोरी
पती-पत्नी हे एसटीने शांती चौक ते अक्कलकोट जात होते. पर्सची चेन उघडून चोराने पर्समधील १,६५,००० रुपयांचे सोन्याचे गंठण आणि नेकलेस चोरून नेले. अन्नपूर्णा युवराज कलशेट्टी (वय ३० रा. सादूल पेट्रोल पंप) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
मोटारसायकलची चोरी
विजापूर रोड येथील पंचरत्न हॉटेल समोर लावलेली एमएच १३, बी डब्ल्यू २२१२ ही दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेली. याबाबत प्रदिप गोविंद चव्हाण वय ३२, रा. माशाळ वस्ती यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. असाच प्रकार मिलेनियम स्वकेअर समोर घडला. एमएच १३, सी ए ८४१६ ही दुचाकी अज्ञात चोराने चोरुन नेली. याबाबत लक्ष्मीनारायण अंबादास गाजेगी वय ४४ रा. जोडभावी पेठ यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
गर्दीमध्ये मोबाइल चोरला
राजेश पायलट चौक ते सग्गम नगर दरम्यान भाजी मंडई येथे उभारले असता अज्ञात चोराने सुनील शरणप्पा माळी (वय ४२ रा. लिंबे चिंचोळी) यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरुन नेला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.