आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना:95 हरकतींची नोंद, 14 जूनला विभागीय आयुक्तांकडे सुनावणी

सोलापूर25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे 77 गट, पंचायत समितीच्या 154 गणांची प्रारुप प्रभाग रचना नुकतीच जाहिर झाली. त्यावर बुधवार (ता. 8) शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल 95 हरकती, सुचना जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत.

प्रभाग रचना करताना गावांची निवड एकसलग ऐेवजी खंडीत पद्धतीने झाली, एकाच गणातील गाव दुसऱ्या गटाला जोडण्यात आले, यासह प्रभाग रचना चुकीची असून त्यामध्ये बदल करा, अशा हरकतींचा समावेश आहे. येत्या 14 जून रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यावर सुनावणी होणार आहे.

दोन जून रोजी जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रारुप प्रभाग रचना प्रशासनाने जाहिर केली. आठ जून पर्यंत त्यावर सुचना, हरकती मागविल्या होत्या. मंगळवार (ता. 7) फक्त 35 हरकती होत्या. पण, बुधवारी शेवटच्या दिवशी तब्बल 60 हरकती दाखल झाल्यात. त्यापैकी काही एकसारख्या आहेत. पंढरपुर आणि अक्कलकोट मधून सर्वाधिक हकरकती दाखल झाल्या आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातूनही एकही हरकत दाखल झालेली नाही.

टेंभुर्णी नगरपंचायत जाहिर झाल्याने तेथील गट, गण रचना रद्द करून नव्याने रचना करण्याची मागणी तेथील काहींनी केलेली आहे. दक्षिण तालुक्यातील होटी गटातील शिंगडगाव, हणमगाव वळसंग गटात गेलीत, वळसंग मधील आलेगाव, इंगळगी, आज (आ.) होटगी गटात आली, या गावामध्ये बदल न करता पूर्वच्या गणांमध्ये ठेवावी, अशीही हरकत आहे. पांडे (ता. करमाळा) गट फोडून दुसऱ्या गटात त्यामधील गावांचा समावेश करु नका, पंढरपूरच्या टाकळी गटतील खर्डी गणामध्ये सोनके गावाचा चुकीचा समावेश झाला आहे, अशा स्वरुपाच्या काही हरकती आहेत.

पंचायत समिती हे ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र, मिनीमंत्रालय अशी जिल्हा परिषदेची ओळख आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही आजी-माजी आमदारांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीतून राजकीय कारकिर्द सुरु केलेली आहे. आगामी विधानसभेची पायाभरणी झेडपी व पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून होत असल्याने, आजी-माजी आमदार, त्यांच्या निकटवर्तीयांचे या निवडणुकांकडे विशेष लक्ष असते.

हरकती घेणारे काही प्रमुख

अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते, बाळासाहेब काटकर, सदस्य उमेश पाटील, शिवसेनाचे पंढरपूर विभागप्रुख संभाजी शिंदे, दक्षिण सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष हरिष पाटील आदींनी हरकती घेतल्या आहेत.

तालुका निहाय हरकती

 • करमाळा : 8
 • माढा : 7
 • बार्शी : 6
 • उत्तर सोलापूर : निरंक
 • मोहोळ : 11
 • पंढरपुर : 15
 • माळशिरस : 2
 • सांगोला : 11
 • मंगळवेढा : 8
 • दक्षिण सोलापूर :9
 • अक्कलकोट : 18
बातम्या आणखी आहेत...