आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य:भल्या-भल्या मातब्बरांना धुळ चारत अवघ्या 21 वर्षीय तरुणाने मारले ग्रामपंचायतीचे मैदान

मोहोळ6 महिन्यांपूर्वीलेखक: भारत नाईक
  • कॉपी लिंक
  • ऋतुराज देशमुखने गावासमोर मांडले विकासाचे मॉडेल, गावाने टाकला विश्वास

निवडणूक म्हणजे घरादाराचा इस्कुट आणि ते काम फक्त रिकामटेकड्या माणसांच आहे, अशी गावच्या निवडणुकीबाबत ग्रामीण भागातील जुन्या जाणकारांची प्रतिक्रिया होती. मात्र, ज्या वयात शिक्षणाचे ओझे घेऊन स्वतःच्या भविष्याचे वेध घ्यायचे त्याच वयात मोहोळ तालुक्यातील घाटणे गावच्या ऋतुराज रवींद्र देशमुख या 21 वर्षीय तरुणाने गावच्या विकासाचे स्वप्न घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचे ठरवले आणि त्यात तो यशस्वीही झाला. सात जागांचा पॅनल त्याने उभा केला होता, स्वतःसह पाच जागा जिंकत त्याने ग्रामपंचायतीवर सत्ताही मिळवली.

शालेय शिक्षण मोहोळ इथे पूर्ण केलेल्या ऋतुराज देशमुख याने विद्यार्थी अवस्थेत महाविद्यालयीन जीवनात येणाऱ्या अडचणी जवळून पहिल्या होत्या. या अडचणी सोडवण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न केले. त्यातुन त्याला सामाजिक प्रश्नाची जाण झाली. इतकेच नाही तर तुमची पात्रता असुन चालत नाही, संधी सुद्धा महत्वाची असते हा कानमंत्र मिळाला.

या काळात येईल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. परंतु याच दरम्यान त्याच्या मनात खंत होती, आपण जिल्ह्यातील मुलांच्या अडीअडचणी सोडवतो पण ज्या गावात लहानाचा मोठा झालो, त्या गावच्या समृद्धीच काय ? तेथील बांधिलकीचे काय ? कारण, आईच्या गर्भाशी जोडलेली नाळ तोडली गेली तरी बाळ आईला आई म्हणणे सोडत नाही. तसेच माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे गावाशी असलेली नाळ तुटली तर आपुलकी संपत नाही. त्यातूनच गावच्या निवडणुकीपूर्वी ऋतुराज याने निर्णय घेतला जर आपल्याला राज्यात एक आदर्श गावं तयार करायच असेल तर स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरण गरजेचे आहे या हेतूने निवडणूक लढण्याचे ठरवले.

त्याने निवडणुकीच्या काळात गावातील प्रत्येक तरुणांना, मतदारांना गावच्या विकासाचा अजेडा मांडला. अनेक निवडणुका आल्या गेल्या असतील परंतु ही निवडणूक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वीज, पाण्याचा प्रश्न, रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी असल्याचे घराघरात पोहोचवले. त्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर केला. ऋतुराज देशमूख याने मांडलेल्या वैचारिक विकासाच्या संकल्पनेवर गावच्या मतदारांनी विश्वास ठेवला व सात जागांपैकी पाच जागेवरती त्याच्या पॅनलला विजयी केले. तो स्वतःही 38 मतांनी जिल्ह्यातील सर्वात तरुण उमेदवार म्हणून विजयी झाला. शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांसाठी प्राधान्यक्रमाने येतात,परंतु गाव स्तरावर त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. ती करण्यासाठी तरुण सुशिक्षित उमेदवाराला घाटणेकरांनी निवडून देऊन एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

'गावाला आदर्श गाव बनवायचे आहे'

गावाला वीज पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी सोलर सिस्टिम तसेच गावातील मूलभूत सुविधांबरोबरच गावची शाळा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी यंत्रणा उभी करण्याला भविष्यात प्राधान्य असेल. गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून माझ्या गावाला सर्व सोयीसुविधांनी युक्त करून ते आदर्श गाव म्हणून जिल्ह्याच्या, राज्याच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न असेल.- ऋतुराज देशमूख (नुतन ग्रामपंचायत सदस्य, घाटणे ता.मोहोळ)

बातम्या आणखी आहेत...