आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिनाभरापूर्वीच २५ लाख रुपये खर्चून बनवण्यात आलेला रस्ता उर्दू घरासाठी ड्रेनेजलाइन जोडण्यासाठी एका रात्रीत विनापरवाना फोडण्यात आला. नियोजनशून्य आणि बेफिकीर वृत्तीमुळे रस्ता बनवण्यासाठी खर्चलेले लाखो रुपये मातीमोल होऊन गेले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांची मिळमिळीत भूमिका पाहता उर्दू घर बांधकाम मक्तेदारावर कठोर कारवाई होईल, याची शक्यता कमी आहे.
सिव्हिल चौक ते अशपाक उल्ला खान चौक या दरम्यान मागील महिन्यात २५ लाख रुपये खर्च करून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती योजनेतून रस्ता तयार करण्यात आला होता. तो रस्ता शनिवारी रात्री विना परवाना फोडून उर्दू भवनसाठी ड्रेनेज जोड देण्यात आला. रस्ता बनवतानाच ड्रेनेज जोडची माहिती दिली असती तर हा प्रकार घडला नसता. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मावळते नगरसेवक रियाज खरादी यांनी केली आहे. सिव्हिल चौक ते अशपाक उल्ला खान चौक हा नुकताच तयार केलेला रस्ता महिन्यातच खोदला गेला. यामुळे मोठे नुकसान झाले. ड्रेनेज जोड द्यायचीच असेल तर परवानगी घेऊन काम करणे आवश्यक होते. विना परवाना जोड देण्यात आला आहे. ड्रेनेज जोडसाठी महापालिकेकडे परवानगी मागण्यात आली नाही.
३२० पैकी ३४ मीटर खोदला
३२० मीटर रस्ता तयार करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यातील ३४ मीटर रस्ता जेसीबीच्या सहाय्याने फोडण्यात आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना पुन्हा खड्ड्यातून किंवा फोडलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागणार आहे. ड्रेनेज जाेडसाठी रस्ता फोडला असेल तर तो रस्ता पुन्हा जैसे थे करणे आवश्यक आहे. परंतु, संबंधित मक्तेदाराने रस्ता पूर्ववत करण्याची हमी घेतली नाही. त्यामुळे फोडलेला रस्ता कोण करणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
पालिकेकडून परवानगी नाही
ड्रेनेज जोड कामासाठी महापालिकेकडून परवानगी घेणे अपेक्षित होते. पण ती घेतली नाही. ड्रेनेजलाइनचे काम आहे. ते जोडणे आवश्यक होते तर परवानगी का घेतली नाही, याबाबत माहिती घेऊ. संदीप कारंजे, नगर अभियंता, पालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.