आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्शल लॉ स्मृती दिन:चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येण्यासाठी अध्यासन केंद्र; संग्रहालयाची व्हावी उभारणी

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरकरांनी साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे. हा इतिहास प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. पूर्वजांचा इतिहास पुढच्या पिढीला माहीत व्हावा. मार्शल लॉ, चार हुतात्म्यांचे शौर्य आणि बलिदान फक्त स्थानिकांपुरते किंवा राज्यापुरते मर्यादित न ठेवता देश व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले पाहिजे. चार हुतात्म्यांच्या नावाने सोलापुरात अध्यासन केंद्र व हुतात्म्यांच्या विविध वस्तूंचे संग्रहालय उभारावे. यासाठी सभागृहाची उभारणी व्हावी. राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे. असे केल्यास खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना वंदन केल्यासारखे होईल, असा सूर मार्शल लॉ स्मृतिदिनी व्यक्त झाला.

स्वातंत्र्यप्राप्ती होण्यापूर्वीच सोलापूर शहराने ९, १० आणि ११ मे १९३० असे ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवले. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांना १२ जानेवारी १९३१ रोजी येरवडा येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. त्या दिवसाची स्मृती जागृत ठेवण्यासाठी सोलापूर इतिहासप्रेमी मंडळीतर्फे मार्शल लाॅच्या ९२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चार हुतात्मा चौक येथील पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हि. ने. वाचनालयात मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. ए. शेख होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी केले. कार्यक्रमास प्रा. सोनाली गिरी, प्रा. संतोष मारकवाड, डॉ. प्रदीप जगताप, प्रा. संतोष हंपे, डॉ. साईनाथ कबाडे, डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्रा. एम. एम. मस्के, प्राचार्य एम. ए. शेख, नितीन अणवेकर, मलप्पा धनशेट्टी यांचे वंशज उपस्थित होते. आभार प्रदर्शन नितीन अणवेकर यांनी केले. सोलापूरच्या अभिमानास्पद इतिहासापासून स्फूर्ती घेण्यासाठी तरुणाईची उपस्थिती लक्षणीय होती.

चार हुतात्म्यांचा इतिहास अन्य भारतीय भाषांतूनही आला पाहिजे
१. प्रत्येकाला स्थानिक व देशाचा इतिहास माहीत असला पाहिजे. सोलापुरातील चार हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी, पुढच्या पिढीला इतिहास कळाला पाहिजे यासाठी, अध्यासन केंद्र, संग्रहालय उभारण्यात यावे. यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. अध्यासन केंद्र सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना वंदन होईल, असे मत प्रा. एम. एम. मस्के यांनी व्यक्त केले.

२. सोलापुरात मार्शल लॉ अचानक पुकारण्यात आलेला नाही. ८० वर्षांचा इतिहास आहे. तो इतिहास प्रत्येकाने माहिती करून घेतला पाहिजे. चार हुतात्म्यांनी जुलमी राजवटीला विरोध करत निकराचा लढा दिला. तो इतिहास वाचून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे, असे डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी सांगितले. सोलापूरचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.

३. चार हुतात्म्यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावेत. याने सोलापूरच्या पर्यटनाला गती मिळावी. चार नरवीरांचे साहित्य फक्त स्थानिक भाषेतच सापडते. त्यांचे साहित्य हे इंग्रजीतच नव्हे तर सर्व भाषांतून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. देशाबाहेरील लोकांना माहिती झाली पाहिजे. यासाठी स्मृती केंद्र, अध्यासन केंद्र होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य एम. ए. शेख यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...