आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फाेट अन् लाेळ:फटाके कारखान्यात राेज  50 कामगार; आठवडी बाजाराने मोठी जीवितहानी टळली

साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहारी कामगार 4 दिवसांपूर्वीच गावाला गेल्याने बचावले

शिराळा-पांगरी (ता. बार्शी) येथील फटाके कारखान्यात दरराेज ४० ते ५० कामगार काम करत असतात. रविवारी पांगरी आणि उक्कडगावात आठवडी बाजार असल्याने १० महिला कामावर आल्या हाेत्या. शिवाय चार दिवसांपूर्वीच बिहारचे कामगार त्यांच्या गावी गेले हाेते. त्यामुळे माेठी जीवितहानी टळली. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील महिलांनी पळ काढला. आगीने लपेटलेल्या महिलांनी उसाच्या फडात पडून तडफडून जीव साेडला. पांगरीत स्वतंत्र पाेलिस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालय असूनही तासभर काेणीच फिरकले नाहीत. तासानंतर पाेलिस आले, परंतु ते लांबूनच बघे बनले हाेते. मदतकार्यात स्थानिक तरुणच झटत हाेते. मिळेल त्या वाहनांनी जखमींना घेऊन जात हाेते. दुपारी अडीचच्या सुमारास संपूर्ण कारखान्याने पेट घेतला. स्फाेट सुरू झाले. आगीचे उंचच उंच लाेळ उठले. रात्री उशिरापर्यंत स्फाेटांची ही मालिका कायमच हाेती. त्याचे कारण कारखान्यात भूमिगत हाैदांमध्ये साठवून ठेवलेला दारूगाेळा. आगीने त्याचा ताबा घेतल्याने रात्री त्याचे स्फाेट सुरू झाले. आग कशाने लागली त्याचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत प्रशासनालाही समजू शकले नाही. कारखान्यात वीजही नाही. रात्री जनरेटर सुरू करून मदतपथके काम करत हाेती. मदत आणि बचावकार्यामध्ये िदव्य मराठीचे बातमीदार सचिन ठाेंबरे सहभागी हाेते.

१९८२ च्या घटनेत मणियार कुटुंबातीलच तिघांचा मृत्यू : युसूफ हज्जू मणियार असे कारखान्याच्या मालकाचे नाव आहे. पिढीजात व्यवसाय असलेल्या मणियार कुटुंबाची तिसरी पिढी यात आहे. त्यांचे दाेन कारखाने आहेत. १९८२ मध्ये घडलेल्या आगीच्या घटनेत मणियार कुटुंबातीलच तिघांना जीव गमवावा लागला हाेता. तेव्हा आदली बनवण्याचे काम सुरू हाेते.

२५० रुपयांच्या मजुरीसाठी जीव धाेक्यात घालून काम कौसल्या सुखदेव बगाडे या जखमी महिलेला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारखान्यातील कामाचे स्वरूप आणि माेबदला याविषयी त्यांच्या चुलत भावाने माहिती दिली. गेल्या १० वर्षांपासून काैसल्या कारखान्यात काम करतात. दरराेज २५० रुपयांची मजुरी मिळते. दिवाळीत हाच माेबदला दुप्पट हाेताे. त्यांचे पती सुखदेव बगाडे शेतात काम करतात.

बचावकार्य सुरूच आहे ^घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरूच आहे. पोलिस, जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने हे कार्य सुरू आहे. आतापर्यंत तीन मृतदेह मिळाले. तीन जखमी आहेत. अद्याप शोधमोहीम सुरूच आहे. आग अजून धुमसतच असून आग पूर्णपणे विझल्यानंतरच मृतांचा आकडा स्पष्ट हाेईल. - शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...