आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वी राज्य नाट्यस्पर्धा:हळव्या, असफल प्रेमाचा स्पर्श - पाऊस ; नाटक सादरीकरण

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबादच्या नाट्य विभागाने डॉ. गणेश शिंदे यांच्या ‘पाऊस’ या संहितेचा तरल प्रयोग करून प्रेक्षकांची उत्तम दाद घेतली. रहस्यमय प्रेमाच्या अंगानं उकलत जाणाऱ्या या प्रयोगात पावसाची ही एक खास भूमिका आहे.

दीपू (सोहन कांबळे) आणि आंसू (अक्षता किरकसे) हे खरं तर एक प्रेमीयुगुल एकाच गल्लीत, एकाच कॉलेजमध्ये असतात. त्यांच्या मनात उमलणारं प्रेम मनातच राहातं. लग्नाचा संकल्पही ते व्यक्त करीत नाहीत. वेळ जाते. आशूचं लग्न तिच्या मनाविरुद्ध होतं. ती मुंबईला जाते, दीपू अस्वस्थ होतो. दिवस जातात. आणि एक दिवस पत्ता आणि सवड काढून तो तिला भेटायला येतो. बाहेर पाऊस कोसळत असतो. ती त्याला घरात घेते. मग आठवणीतून उलगडते मनातलं प्रेम आजही कोमेजलेलं नाही. ते ताजं आहे. पण करणार काय? मग थोड्या घडामोडी घडतात. आणि निरोपाची वेळ येते. दोघंही घायाळ होतात. अखेर रहस्यभेद होतो. आशूचा नवरा तिला सोडून गेला आहे. घरचं भाड तटलेलं आहे. तिच्या नकळत तो ते भरतो. तिला त्रास नको म्हणून जास्तीचे पैसे घरमालकाला देतो. तिच्याकडे छत्री खरेदी करायलाही पैसे नसतात. पण त्याला काळजी नको म्हणून ती सांगत नाही. अखेर त्याला गरीब समजून तिने त्याच्या रेनकोटमध्ये स्वतःचे दागिने आणि पत्र ठेवलेलं असतं. त्यानंही असंच एक पत्र तिथं खुर्चीवर ठेवलेलं असतं. भाडे भरल्याची पावती, त्याने मुद्दाम विसरलेली छत्री यातून सारे उलगडते. निरोप घेतो. पाऊस कोसळत असतो. दोघंही शोक सागरात बुडून जातात, अशी ही तरल कथा प्रयोगातून पोहोचते.

सोहनचा दीपू - प्रियकर म्हणून दिलदार, संयमी आणि भावनाप्रधान वाटतो. त्याने आपल्या तरल आणि भावव्याकूळ अभिनयाने प्रेक्षकांना काबीज केले. भीती, स्त्रीसुलभ मत्सर, हळवेपणा, प्रेम या भावभावनांचा आविष्कार अक्षता किरकसे यांच्या ‘आशू’ने छानच केला. अविनाश चंदनकर घर मालक, सेल्समन या दोन्ही पैलूंचे वेगळेपण उत्तम पेश केले. नामदेव भोयटे आणि कानिफनाथ सुरवसे यांच्या भूमिका नगण्य होत्या. डॉ. सय्यद अहमद (प्रकाशयोजना), सोमनाथ भंडारे (संगीत) या तांत्रिक बाजूंनी प्रयोगाला प्रभावित केले. गणेश मरोड यांनी नेपथ्य म्हणून जास्तीचा प्रसारा मांडला होता. रंगभूषा (डॉ. उषा कांबळे) वेशभूषा (प्रताप छावरे) यांचे सूर छान जुळतात.

बातम्या आणखी आहेत...