आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी आल्या महालक्ष्मी:आरासात रमल्या गृहलक्ष्मी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायाच्या पाठोपाठ येणाऱ्या गौरींना शनिवारी दिवसभर उत्साहात आवाहन करण्यात आले. भाजी-भाकरीचा नैवेद्य, औक्षण आणि एकत्र कुटुंबाची मांदियाळी अशा वातावरणात गौरींचे स्वागत करण्यात आले. महालक्ष्मींचे आगमन झाल्यापासून सामाजिक संदेश देणाऱ्या आरासाला महिलांनी सुरुवात केली. पानाफुलांच्या हिरवाईला आणि राशींच्या पारंपरिक आरासालाही महिलांची पसंती असल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी गौरी पूजन आहे. याकरिता महिलांनी सोळा भाज्या, गोड नैवेद्य यांची तयारी सुरू केली. त्यात येणाऱ्या- जाणाऱ्या पाहुण्यांची वर्दळही सुरू आहे. यंदाच्या गौरी उत्सवाचा वेगळाच उत्साह आहे. महिला मोठ्या हिरीरीने संपूर्ण उत्सव परिपूर्ण करण्यासाठी तल्लीन होऊन झटताना पाहायला मिळत आहेत.

फुलांच्या रांगोळीला आले महत्त्व
यंदाच्या वर्षी नवरंगी रांगोळीला फाटा देत महिला फुलांच्या रांगोळीला अधिक महत्त्व देत आहेत. या रांगोळी मांडवात काढणे आणि नंतर त्या पुन्हा आपल्या सोयीनुसार सुकल्यानंतर बाजूला करणे सोपे होत आहे. त्यामुळे महिला याला प्राधान्य देताना दिसत आहेत. अष्टर, जरबेरा, गुलाबाच्या पाकळ्या, शेवंती, मोगऱ्याची फुलं, तगर, चाफा, बदाम व अशोकाची पाने अशा फुलापानांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. बटण गुलाब यालाही अधिक पसंती दिली जात आहे.

सोळा भाज्यांचे दर वाढवले : सायंकाळपर्यंत बाजारात १६ भाज्यांचे दर वाढवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात लक्ष्मी मंडई, कस्तुरबा मंडई, ७० फूट रस्ता येथील बाजारांचा समावेश होता. विक्रेत्यांनी अनेक भाज्यांची चढ्या भावाने विक्री केली. त्यामुळे सुवासिनींची आयत्यावेळी बरीच पळापळ झाली.

कोरोनामुळे दोन वर्षे सगळे सण, उत्सव कोरडेच वाटत होते. आर्थिक टंचाईही होती. आता थोडीशी आर्थिक परिस्थिती आणि मानसिकता बदलण्यास मदत होत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी खूप दिवसांनी अनोखा आनंद मिळणार आहे. अनिता राऊत, सुवासिनी

बातम्या आणखी आहेत...