आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Airport In Mumbai Palghar | Maharashtra Airport Update | Acquisition Of 2584 Hectares Of Land For Airports In The State

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:राज्यात विमानतळांसाठी 2584 हेक्टर जमिनीचे संपादन; पण उभारणी नाहीच

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात नवे विमानतळ उभारण्याच्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. नवी मुंबई वगळता पुणे, साेलापूर, अमरावती, कराड, धुळे, चंद्रपूर या विमानतळांच्या उभारणीस निधी देण्यासाठी शासनाने हात आखडता घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने २५८४ हेक्टर जमिनीचे संपादन केले; पण विमानतळ उभारणीसाठी येणाऱ्या अडचणी न सुटल्याने विमानतळ रखडले आहेत. राज्यात मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, शिर्डी, नाशिक, जळगाव, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद येथून विमानसेवा सुरू आहे. मुंबई, पुणे वगळता इतर ठिकाणी इतर खासगी कंपनीच्या मदतीने विमानसेवा सुरू आहे. केंद्राच्या ‘उडान’ या याेजनेत राज्यातील ९ शहरांचा समावेश होता. त्यापैकी नाशिक, जळगाव, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड व सिंधुदुर्ग येथून विमानसेवा सुरू झाली. मात्र, सोलापूर, अमरावती व रत्नागिरी येथील विमानसेवा तांत्रिक कारणामुळे रखडली.

महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनीकडून साेलापूर, अमरावती, कराड, धुळे, चंद्रपूर या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याबाबत हालचाली नाहीत. सोलापूर, अमरावती, कराड व चंद्रपूर या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या परवानग्या, पर्यावरण विभागाकडून ना हरकत यासह इतर परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबईसाठी पालघर येथे तिसरा विमानतळ उभारण्याचे नियोजन असून जमीन संपादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘उडान’ योजना : नाशिक, जळगाव, कोल्हापूर, नांदेडात विमानसेवा सुरू झाली; मात्र सोलापूर, अमरावती, रत्नागिरीत रखडली
विमानतळांसाठी भूसंपादन
नवी मुंबई ११६० हेक्टर
सोलापूर ५४९ हेक्टर
अमरावती ४०९ हेक्टर
चंद्रपूर ३३६ हेक्टर
कराड ६७ हेक्टर
धुळे ६३ हेक्टर
एकूण २५८४ हेक्टर

नागपूर, शिर्डीत सुरू...
मिहानकडून नागपूर विमानतळाचे काम १५ हून अधिक वर्षे सुरू होते. शिर्डीत नाइट लँडिंगची व्यवस्था नाही. काकडी येथे विमानतळाचे नियोजन आहे. सिंधुदुर्ग येथील चिप्पी विमानतळाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाली आहे.

अमरावती : ३३५ हेक्टर संपादित
या विमानतळाचा उडान याेजनेत समावेश आहे. जुन्या विमानतळावरूनच विमानसेवा सुरू करण्यात येणार असून राज्य शासनाकडून विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरू होणार असल्याचे विमानतळ विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. ३३५ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे.

सोलापूर बोरामणी कार्गो : ५४९ हेक्टर जागा घेतली ताब्यामध्ये
सोलापूरसाठी बोरामणी येथे नवीन कार्गो विमानतळाची २००९ मध्ये घोषणा झाली. ५४९ हेक्टर जागा ताब्यातही घेण्यात आली. पण अद्याप विमानतळ संपादन प्रक्रियेतच आहे. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी २०१४ मध्ये विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते, पण अद्याप विमानतळाचे कामच सुरू झाले नाही.

कराड आणि चंद्रपूर विमानतळ
कराड व चंद्रपूर विमानतळांसाठीही जमीन संपादित झाली. मात्र, कराड विमानतळ विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. चंद्रपूर विमानतळासाठी संपादनाचे काम सुरूच आहे. ७५ एकर जमिनीच्या निर्वनीकरणाचा प्रश्न आहे.

पुणे : ३३६५ एकर जागेसाठी मंजुरी
पुणे शहराला स्वतंत्र विमानतळासाठी पुरंदर तालुक्यात ६ ठिकाणांची पाहणी केली असली तरी अद्याप जागा निश्चित करण्यात आली नाही. २००९ मध्ये ३३६५ एकर जागा संपादित करण्यास शासनाने मंजुरी दिली असली तरी जागाच अंतिम केली नाही.

नवीन कायद्यात जमीन परत देण्याची तरतूद...
२०१४ मध्ये संपादन कायद्यात बदल झाला. कलम ९९ नुसार ज्या कारणासाठी जमीन घेतली आहे, त्यासाठीच वापरावी लागेल. कलम १०१ नुसार जमीन संपादन पूर्ण झाले असेल व प्रकल्प ५ वर्षांत पूर्ण न झाल्यास जमीन मूळ मालकास परत करण्याची तरतूद आहे, किंवा ती जमीन शासनाला लँड बँक म्हणून स्वत:जवळ ठेवता येऊ शकते. जुन्या कायद्यानुसार, २०१४ पूर्वी संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर जमीन मूळ मालकास परत देण्याची तरतूद नाही.

विमानतळांसाठी पाठपुरावा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. उडान योजनेंतर्गत ९ पैकी ६ विमानतळांवरून सेवा सुरू आहे. रत्नागिरी, सोलापूर व अमरावती या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे विमानसेवा सुरू झाली नाही. जमिनीचे संपादन केलेल्या ठिकाणी नवीन ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण यासह विविध केंद्रीय विभागांच्या परवानगीसाठी पाठपुरावा सुरू आहे. - दीपक नलावडे, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण.

बातम्या आणखी आहेत...