आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारु विरोधात मोहिम राबविण्यात येत असून 15 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुळेगाव तांड्यावरुन निघालेल्या जीपचा पाठलाग करुन एक हजार दोनशे साठ लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, 18 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे मतदान होणार आहे. निवडणूक पारदर्शकरीत्या व शांततेत पार पाडावी याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1 डिसेंबरपासून जिल्ह्यात अवैध दारु, ताडी, परराज्यातील दारु इ. विरुद्ध कडक मोहीम राबविण्यात येत असून धाब्यांवर दारु पिण्याची व्यवस्था करुन देणारे तसेच तेथे बसून दारु पिणा-यांवरही विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान 15 डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रात्री 9 वाजेच्या सुमारास मुळेगाव तांडा रोडवर पाळत ठेवली असता मुळेगाव तांड्यातून एक जीप क्रमांक MH-06 W-6837 ही भरधाव वेगाने बोरामणीकडे जात असतांना दिसून आली.
या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता जीपचालकाने भरधाव वेगाने जीप पळवून लावण्याचा प्रयत्न केला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जीपचा सिनेस्टाईल पाठलाग करुन सोलापूर-हैद्राबाद रोड वरील मुळेगाव तांड्याच्या हद्दीतील डाळ मिल समोरील रोडवर विभागाला ही जीप पकडण्यात यश आले. जीपची झडती घेतली असता त्यात वाहनचालक धर्मराज अंकुश माने व भगवान देविदास निकम (दोघेही राहणार- बक्षी हिप्परगा ता. दक्षिण सोलापूर) बसलेले आढळून आले. दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन जीपमधील त्यांच्या ताब्यातील 14 रबरी ट्यूबमध्ये भरलेली एक हजार दोनशे साठ लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनासह एकूण पाच लाख चौसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.