आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन:शिरीष घाटेंच्या ‘पुस्तकांच्या चित्रवाटा’चे अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध चित्रकार शिरीष घाटे यांच्या ‘पुस्तकांच्या चित्रवाटा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (दि. ४) होणार आहे. हि. ने. वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता हा सोहळा होत आहे. पटकथा लेखक व अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ चित्रकार भगवान चव्हाण हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू फडणवीस, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा उपस्थित राहतील.

१९८० मध्ये बार्शी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यात शिरीष घाटे यांनी ज्ञानेश्वर ते ढसाळ अशी कविताचित्रे केली. राज्यातील नामवंत प्रकाशकांनी त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ बनवण्याची जबाबदारी श्री. घाटे यांच्यावर सोपवली. त्यानंतर या क्षेत्रात त्यांची मुशाफिरी चांगली सुरू झाली. कुठलेही पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय घाटे मुखपृष्ठ तयार करीत नाहीत, ही त्यांची अटच असते. त्यातूनच साहित्य व कला यांना एकत्र गुंफताना त्यांच्या विशिष्ट शैलीचा विकास सुरू झाला.

आतापर्यंत श्री. घाटे यांनी असंख्य मुखपृष्ठ चितारली आहेत. त्यातील शंभर मुखपृष्ठ निवडून त्यामागील निर्मिती प्रक्रिया थोडक्यात यात नोंदवली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशनाने केले आहे. या समारंभाचे आयोजन भाई छन्नुसिंग चंदेले स्मृती केंद्राने केले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालीचे सुरेश हिंगलासपूरकर, हेमू चंदेले, कॉ. रवींद्र मोकाशी, प्रा. विलास बेत, डॉ. श्रीकांत नारकर, डॉ. सरिता मोकाशी व प्रा डॉ. रोझा चंदेले पराशर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...