आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेदांता फॉक्सकॉन प्रकल्प 100 टक्के राज्यात येणार होता. त्यासाठी आम्ही काम करत होतो. मात्र, गद्दारी करुन या खोके सरकारने हे प्रकल्प गुजरातला दिले व राज्यातील लाखो तरुणांचे हक्काचे रोजगार हिरावले गेले, अशी घणाघाती टीका आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.
गणपतराव देशमुख समाधीस्थळाचे दर्शन
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात आली. आदित्य ठाकरेंनी दिवंगत शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. सांगोल्यातील शिवसेना शाखेचे उद्घाटन केले व त्यानंतर जाहीर सभेत शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली.
लाखो तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील लाखो तरुण सध्या रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना निश्चित असे उत्पन्न हवे आहे. त्यासाठी जवळपास 2 लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्यात यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत होते. अगदी जानेवारीपासून ते सरकाराई जाईपर्यंत म्हणजे जुलैपर्यंत मी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई या प्रकल्पाचा पाठपुरावा करत होतो. हा प्रकल्प 100 टक्के महाराष्ट्रात येणार होता.
गद्दारांनी प्रकल्प गुजरातला दिला
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील खोके सरकार आल्यानंतर मात्र गद्दारांनी वेदांता प्रकल्प गुजरातला दिला. त्यानंतर बल्ड ड्रग्ज पार्क, टाटा एअर बस असे एकामागून एक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. उद्योगमंत्री नेमके करत तरी काय आहेत, असा प्रश्न पडतो. एवढे हक्काचे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे उद्योगमंत्र्यांना आता पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा.
खोके सरकार जनतेचे नाही
आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसंवाद यात्रेत मी तरुणांच्या मनात काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तरुण कृषि व उद्योग या दोन्ही विभागांवर प्रचंड नाराज असल्याचे दिसत आहे. कृषिमंत्री शेतीच्या बांधावर कधी येतील, ओला दुष्काळ कधी जाहीर करतील, अशी वाट बळीराजा पाहत आहे. गावातील तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत शहरात येत आहे. मात्र, शहरातही त्याला आता रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे हे सरकार जनतेचे नाही, हे स्पष्ट होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.