आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:90 वर्षांनंतर पंढरपूरच्या मंदिरात नव्याने लागणार कान्हाेपात्रेचे झाड

पंढरपूर / महेश भंडारकवठेकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विठ्ठलाला आळवणाऱ्या कान्हाेपात्रेच्या समाधीजवळ असलेले तरटीचे झाड आता नव्याने मंदिरात लावले जाणार आहे. ९० वर्षांनंतर मंदिरात कान्हाेपात्रेच्या (तरटी) झाडाचे नव्याने राेपण केले जाईल. आषाढी एकादशी, २० जुलै राेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे वृक्षाराेपण केले जाणार आहे. नऊ दशकांपासून कान्हाेपात्रेच्या समाधीजवळ असलेले हे तरटीचे झाड आता पूर्णपणे वाळले आहे. त्यामुळे त्याच कान्हाेपात्रेच्या झाडाच्या ठिकाणी नव्याने याच जातीचे झाड लावले जाणार आहे. विठ्ठल मंदिराच्या तरटीद्वाराजवळच कान्होपात्रांची समाधी आहे. त्या ठिकाणी कान्होपात्रेची मूर्तीदेखील आहे. त्या ठिकाणी सुमारे ९० वर्षांपूर्वीचे तरटी वृक्षाचे झाड आहे. कान्होपात्रेच्या समाधीजवळ हे झाड असल्याने ते कान्होपात्रेचे झाड म्हणून ओळखले जाते. सध्याचे झाड हे खूपच वाळले आहे. अनेक महिन्यांपासून शोधमोहीम : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून तरटी वृक्षाची शोधमोहीम सुरू होती. मात्र तरटी वृक्ष कुठेही दृष्टीस पडत नव्हता. नंतर मंदिर समितीच्या एका कर्मचाऱ्याला या वृक्षाबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार चार ते पाच वर्षांचे तरटी वृक्षाचे रोपटे मंदिर समितीकडे आणण्यात आले.

वृक्षाला स्पर्श झाल्यावर यात्रा पूर्ण झाल्याची भावना
दर्शनरांगेच्या अगदी जवळच हे झाड आहे. त्यामुळे दर्शनरांगेतील भाविक या झाडाला स्पर्श करतात. त्याचे दर्शन घेतात. या झाडाला स्पर्श केल्यानंतर यात्रा पूर्ण झाल्याची भाविकांची भावना असते.

बातम्या आणखी आहेत...