आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:रंगभूमीसाठी आगाशे यांनी अनमोल क्षण वेचले ; सुशीलकुमार शिंदे यांचे गौरवोद्गार

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुणवत्तेच्या कलाकृती साकारणाऱ्या मराठी रंगभूमीला डॉ. मोहन आगाशे यांच्या रूपाने पडलेले एक स्वप्न असून, मराठी रंगभूमीसाठी त्यांनी अनेक अनमोल क्षण वेचले. त्यांचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. रविवारी हि. ने. वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये श्रुती मंदिर संस्थेतर्फे प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना गुरुवर्य पद्माकर देव स्मृती गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिंदे हे बोलत होते. श्रुती मंदिरकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार, सन्मानचिन्ह, उपरणे आणि पगडी असे आहे.

यावेळी श्री. शिंदे यांनी नेता आणि अभिनेता यातील फरक स्पष्ट करून सांगितला. नेत्याला आणि अभिनेत्याला बऱ्याचदा चेहऱ्यावरील भाव एक आणि मनात विचार एक, असे दाखवावे लागतात, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक श्रुती मंदिर संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी यांनी केले. यावेळी नाट्य परिषद सोलापूर शाखेतर्फे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते डॉ. आगाशे यांचा सत्कार करण्यात आला.

नाट्य, चित्रपटांत सर्व कला एकत्रित येतात
यावेळी डॉ. आगाशे यांनी त्यांच्या कारकिर्दीबद्दल ‘नाना ते नानाविध’ या विषयावर मार्गदर्शन केले. नाट्य व चित्रपटात सर्व कला एकत्रित येतात. जीवनसुद्धा एक नाटक आहे. आवड व क्षमता वेगळ्या गोष्टी आहेत. आवडीच्या क्षेत्रात काम करताना क्षमता असली, मेहनत करायची तयारी असली तर क्षेत्र कोणतेही असो तिथे यश मिळते असे डॉ. आगाशे यांनी सांगितले. या कार्यक्रमास श्रुती मंदिर संस्थेच्या सचिव विद्या काळे यांच्यासह रसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...