आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूरची ओळख उत्सवप्रिय आणि बहुभाषिक शहर अशी आहे. दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, विविध महापुरुष जयंती, उत्सव होतात. कामगार वस्तीमुळे शासन दरबारी न्याय मागण्यासाठी मोर्चा, आंदोलने होतात. व्हीआयपी बंदोबस्त असतो. सदर बझार पोलिसांचा व्हीआयपी बंदोबस्त, आंदोलन मोर्चा यातच वेळ जातो. फौजदार चावडी पोलिसांचा वेळ मिरवणुका, आंदोलन यातच खर्ची पडतो. यामुळे, पोलिसांच्या मुख्य कामाकडेच (गुन्हे शोध, तपास) दुर्लक्ष होत आहे.
मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी, वाहतूक विस्कळीत होणे हे प्रकार नित्याचेच आहेत. बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरातच या मिरवणुका होत असल्यामुळे परगावाहून आलेल्या नागरिकांनाही मोठा त्रास होतो. अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडण्याचे प्रसंग उद्भवतात. याकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. लोकशाहीत सर्वांनाच न्याय हक्कासाठी आंदोलन, मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, याबाबत दुमत नाही. परंतु, ते करताना सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, रुग्णवाहिका अडकणार नाही याचीही काळजी आंदोलन करणाऱ्या प्रमुखांनी तसेच वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे.
२ वर्षांत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर १०७ गुन्हे
मागील दोन वर्षांत सातही पोलिस ठाणे हद्दीत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर जमावबंदी आदेश मोडला, करोना नियम पाळले नाही, विनाकारण मोर्चा काढला या कारणांमुळे १०७ गुन्हे दाखल आहेत. पक्षनिहाय गुन्हे दाखल याप्रमाणे.. काँग्रेस (३४), भाजप (१६), राष्ट्रवादी काँग्रेस (९), शिवसेना (५), वंचित बहुजन आघाडी (११), बहुजन मुक्ती पार्टी (१), प्रहार संघटना (१), मनसे (२), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (२०), जनहित शेतकरी संघटना (१), आरपीआय आठवले गट (१), जनशक्ती पक्ष (१), रयत क्रांती संघटना (१), एमआयएम (४).
सोलापुरात साजरे होणारे मुख्य उत्सव व जयंती
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रतापसिंह, महात्मा बसवेश्वर जयंती, मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, सिद्धेश्वर यात्रा, मोहरम व अन्य उत्सव.
कायद्याच्या चौकटीत करावेत उत्सव : शहरात सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येकाला उत्सव, सण साजरा करण्याचा अधिकार आहे. यातून एकोपा वाढतो. पण, उत्सव - सण साजरा करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरा करावा. यासाठी वाहतूक, बंदोबस्त नियोजनाचा प्रयत्न राहील, असे नूतन पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.