आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विमानतळ प्राधिकरण ; नाव लावण्यास विलंब, विमानतळाच्या उताऱ्यावर अद्याप शासनाचेच आहे नाव

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होटगी रस्त्यावरील उर्वरित जमिनीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव लावण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी अर्ज दिला आहे पण त्याचा अद्यापपर्यंत कोणताच विचार झाला नाही. यामुळे विमानतळावर नाव लावण्यासाठी इतका विलंब का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी उताऱ्यावर सध्या महाराष्ट्र शासनाचे नाव आहे, विमानतळ प्राधिकरणाचे नाव लावण्यासाठी अपील करावे लागते, अर्ज दिल्यानंतर नाव लावता येत नसल्याचे स्पष्ट केले.

होटगी रस्त्यावरील विमानतळाची संपादन प्रक्रिया १९५३ ते १९६१ पर्यंत राबविण्यात आली होती पण उताऱ्यावर नाव लाबण्याबाबत विमानतळ प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. नंतरच्या काळात संपादित जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. दरम्यानच्या काळात हे विमानतळ राज्य शासनाकडे हस्तांतरण करण्यात आले. मूळ कागदपत्रे गायब झाल्याने केंद्र सरकार की सरकार हा विषय सुरू होता. उताऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महाराष्ट्र शासन नाव लावण्यात आले. मूळ कागदपत्रे गहाळ झाल्याचा विषय ‘दिव्य मराठी’ने सातत्याने लावून धरल्यानंतर कागदपत्रे शोधण्यात आली. त्यामध्ये निवाडासह संपूर्ण फाइलच मिळाली. यावरून पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली जमीन केंद्र शासनाच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नावे करण्यात आली, पण काही ३६ एकराचे दोन गट नाव लावण्यात आले नव्हते. त्यावर नाव लावण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्यावर प्रांताधकारी निकम यांनी अपील करण्याच्या सूचना केल्याचे सांगितले.

अर्ज नाही, अपील करावे लागते... उत्तर तहसील कार्यालयात स्वतंत्र बैठक घेण्यात आली होती. बैठकीत महाराष्ट्र शासनाचे नाव उताऱ्यावर लावण्यात आले आहे, तो फेरफार तयार झाला आहे. हा फेरफार रद्द करण्यासाठी नव्याने अपील दाखल करावे लागते. तशी सूचनाही संबंधित विमानतळ अधिकाऱ्यांना केली होती. संबंधित अधिकारी व वकिलांकडून अपील दाखल केल्यानंतर ८ दिवसांत नाव लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. हेमंत निकम, प्रांताधिकारी.

हरित लवादाच्या आदेशानुसार प्रदूषण विभागाकडून कारवाई सोलापूर विमानसेवेस अडथळा ठरत असलेल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरणीय अनुमती घेण्याचे आदेश दिले आहेत, तोपर्यंत गाळप थांबवावे, असेही हरित लवादाने नमूद केले आहे. याबाबत आता प्रदूषण नियंत्रण अधिकारी पुढील कारवाई करणार आहेत. चिमणीबाबतची सद्यस्थिती काय आहे ? याचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विमानसेवा सुरू होण्याबाबत व चिमणीबाबतची सद्यस्थिती काय आहे ? याचा माहिती जाणून घेतली. हरित लवादाने दिलेल्या आदेशांबाबत प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांनी कारवाई करावी. महापालिका आयुक्तांसमोर ५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर आयुक्ताकडून आदेश पारित केले जाणार आहेत.

प्रदूषण अधिकारी पाटील स्विच ऑफ... हरित लवादाने व पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिलेल्या आदेशावर प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांनी काय कारवाई केली ? याची विचारणा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण अधिकारी अजित पाटील यांना मोबाइलवर वारंवार संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी आणि बुधवारीही प्रदूषण अधिकारी अजित पाटील मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...