आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेहू येथे पंतप्रधान मोदींच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू दिले नाही, म्हणजे महाराष्ट्राचा अपमान वगैरे झालेला नाही. देवेंद्र फडणवीस व अजित पवार एकत्र येतात, तेव्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण?, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे सभेत फडणवीस बोलले आणि अजित पवार बोलले नाहीत. पहाटेचा सरकार स्थापनेचा तो प्रसंग कदाचित सुप्रियाताईंना आठवत नसेल, अशी मिश्किल कोपरखळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी लगावली. तसेच, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, तो राज्याचा अपमान नाही? असा सवालही त्यांनी सुप्रिया सुळे यांना केला.
शासनाची पंचायत राज समिती बुधवारपासून 3 दिवसांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यामध्ये सदाभाऊ खोत यांचाही सहभाग आहे. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना खोत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर खास ग्रामीण भाषेत उत्तर दिली.
संजय राऊतांचे अभिनंदन
शरद पवार यांनी स्वतः राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक नाही, असे जाहीर केले आहे. पण, राऊत राष्ट्रपती पदासाठी त्यांचेच नाव पुढे करुन वेगळीच मागणी करत आहेत. राऊत यांचे बोलणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचाच प्रकार आहे, अशी टीका खोत यांनी केली. शरद पवार यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करावे, असे संजय राऊत म्हणाले नाही. त्याबद्दल संजय राऊत यांचे अभिनंदन करतो, असा टोला खोत यांनी लगावला.
ईडीची चौकशी भाग्यवंतांकडे
ईडी सध्या ज्या माणसांची चौकशी करत आहेत, ती माणसे भाग्यवान आहेत. कारण लक्ष्मी त्यांच्याकडे सोनपावलांनी अवतरली आहे. राज्यात ज्यांच्याकडे लक्ष्मी अशी अवतरली, त्यांच्याकडेही ईडीने जावे. त्यामुळे आणखी कोण-कोण असे भाग्यवान आहेत, हे राज्याला कळेल, असे सदाभाऊ खोत म्हणाले
विनोदवीरांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे
खरिपाच्या हंगामात वादळ, ढगफुटीसारखा पाऊस काही भागात झाल्याने केळी बागांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाला वेळ नाही. कृषिमंत्री कोण आहेत, हे समजत नाही. मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी रोज नवनवे विषय चर्चेला आणून त्यामध्येच जनतेला गुरफटत ठेवण्याचा प्रकार राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, असा आरोप खोत यांनी केला. विनोदवीरांनी आता थोडा संयम ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. मी स्वतः विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेतल्यानंतर घरी न जाता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर गेलो. त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेतोय, असे खोत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.