आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अजित पवार यांचा सोलापूर व्हाया उस्मानाबाद दौरा; पण स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे टाळले

विठ्ठल सुतार| सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी आवडते असलेले सोलापूर धाकल्या पवारांचे म्हणजेच अजित पवारांसाठी नावडते ठरले आहे. सोलापूर व्हाया उस्मानाबादचा दौरा आटोपून ते सोलापूरहूनच गेले पण सोलापूरचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही. विशेष म्हणजे सोलापूर संघटनेतील वाढते वाद व पक्ष संघटनेतील फूट पाहून अजित पवारांनी सोलापूरला येणेच टाळल्याची चर्चा पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणारे अजित पवार यांनी सोलापूरहून उस्मानाबादला जाणे पसंत केले पण सोलापूरमध्ये येण्याचे टाळल्याने त्यांचे प्रेम कमी झाले का ? अशी शंका कार्यकर्त्यांकडून उपस्थित झाली आहे.

पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
माजी महापौर महेश कोठे यांच्या पक्षप्रवेशावरून पक्षात कमालीचे मतभेद निर्माण झाले होते, अखेर ते वाद शरद पवारापर्यंत पोहोचले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत बैठक होऊन वाद मिटल्याचे सांगण्यात आले पण शहरातील पक्षाची पडझड सुरूच आहे. महिला पदाधिकाऱ्यांनंतर माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महेश कोठे यांच्याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण कायम आहे. यामुळे राज्याचे वरिष्ठ नेते सोलापूरला टाळत असल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

दोन वेळा दौरा पण...
नवरात्र उत्सव काळात अजित पवार हे उस्मानाबादहून सोलापुरात रात्री उशिरा आले. सकाळी महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांना अभिवादन करून सकाळी ७ वाजताच रवाना झाले. यावेळीही ते कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटले नाहीत वा बैठक घेतली नाही. रविवारीही त्याचीच पुनरावृत्ती झाली. यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

खो-खो स्पर्धेसाठी दौरा...
उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे. शिवाय स्थानिक प्रश्न, साखर कारखान्यांच्या अडचणी याबाबतचे विषय संबंधितांकडून समजून घेतले. दौरा आटपून ते तुळजापूरवरून सोलापूरमार्गे पुढे बारामतीकडे मार्गस्थ झाले, पण सोलापूरसाठी मात्र त्यांनी वेळ दिला नाही. याबाबत पदाधिकारीही आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगतात.

बातम्या आणखी आहेत...