आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Akkalkaetkar, A Kannada Speaker Said, I Am From Maharashtra, What About Karnataka; Common People Along With Political Leaders Rocked Karnataka| Marathi News

सीमावाद पुन्हा उफाळला:अक्कलकाेटकर, कन्नड भाषिक म्हणाले, मी महाराष्ट्राचा, काय संबंध कर्नाटकचा; राजकीय नेत्यांसह सामान्य जनतेने कर्नाटकला ठणकावले

साेलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी साेलापूरसह अक्कलकाेटची मागणी केली. त्यामुळे सीमावादावर पुन्हा चर्चा सुरू झाली. अक्कलकाेटकर आणि कन्नड भाषिकांनी कर्नाटकाला ठणकावून सांगितले, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. काय संबंध कर्नाटकचा...? राजकीय नेत्यांसह सामान्यांनी कर्नाटकात जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टपणे सांगून टाकले. दरम्यान मनसेने कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या फलकाला जोडे मारो आंदाेलन केले. या वादावर सोलापूरसह जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा मनसेकडून निषेध
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ४० गावे कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलाय. यावर आता संपूर्ण महाराष्ट्रात वादंग उठले असून राजकीय वर्तुळातून विरोध होताना दिसत आहे. जागोजागी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईं यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोलापुरात चार हुतात्मा स्मारकासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, अमर कुलकर्णी, अभी रंपुरे, गोविंद बंदपट्टे आदी सहभागी होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. परवानगी विना आंदोलन केल्याने मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

वि. गु. शिवदारे यांनी महाजन आयाेगासमाेर भूमिका मांडली
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर नियुक्त झालेल्या महाजन आयाेगासमाेर दिवंगत आमदार वि. गु. शिवदारे यांनी स्पष्ट भूमिका मांडली हाेती. भाैगाेलिक स्थिती आणि भाषा कर्नाटकला पूरक वाटत असेल. परंतु या भूभागावरील लाेक महाराष्ट्रीय संस्कृती, मातीशी, एकरूप झाली. ही नाळ ताेडणे केवळ कठीण. कर्नाटकाने त्याची अपेक्षाच करू नये, असे स्पष्टपणे सांगितले. अक्कलकाेटचे माजी नगरसेवक मुस्तफा बळाेरगी यांनीही कर्नाटकात जाणार नाही, असे आयाेगाला लेखी लिहून दिले, असे नगर परिषदेचे विराेधी पक्षनेते अशपाक बळाेरगी म्हणाले.

महाराष्ट्राशी नाळ जुळली
मी सीमावर्ती भागातील एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगताे की, अक्कलकाेटमध्ये कन्नड भाषिक अधिक असले तरी त्यांची महाराष्ट्राशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे कर्नाटकात जाण्याचा विचारही करू शकत नाही. अक्कलकाेटला महाराष्ट्रापासून काेणीही ताेडू शकत नाही. सचिन कल्याणशेट्टी,आमदार

भाजपचे हे षड््यंत्र
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या तीन पिढ्यांपासून चालत आलेला आहे. पहिली पिढीही कर्नाटकात जाण्यास तयार नव्हती. तिसरी पिढीही नाही. महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेली ही मंडळी साेडा, चिटपाखरूही कर्नाटकला जाणार नाही. लोकांचे लक्ष दुसरीकडे विचलित करण्याकरिता हे भाजपाचे षड््यंत्र आहे. सिद्धाराम म्हेत्रे, माजी गृहराज्यमंत्री

साहित्य -शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर म्हणतात
सीमावादाचा मुद्दा नवीन नाही, तो जुनाच आहे. हा वाद नसून ही न्यायालयीन लढाई आहे. त्या प्रक्रियेत इतर राजकीय व्यक्तींनी भाष्य करणे चुकीचे आहे. चुकीच्या वक्तव्याने भावना तीव्र होतील.' - महेश इंगळे, अध्यक्ष वटवृक्ष मंदिर अक्कलकोट

महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना आणि कर्नाटकातील मराठी भाषिकांना तेथील सरकारांनी योग्य न्याय द्यावा. भाषेचा भेदभाव न करता आधी भारतीय आहोत हे विसरून चालणार नाही.' - सोमशेखर जमशेट्टी, कन्नड साहित्य परिषद

बातम्या आणखी आहेत...