आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकलूज येथील प्रांत कार्यालयामध्ये कायमस्वरूपी प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यासंबंधी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याच्या आश्र्वासनानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात आल्याची माहिती किरण साठे यांनी दिली.
अकलूज येथील प्रांत कार्यालयात गेली वर्षभरापासून कायमस्वरुपी प्रांत अधिकारी नाहीत. माळशिरस तालुक्यातून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी या रस्त्यालगतच्या जमिनी भूसंपादित केलेल्या आहेत. त्यात अनेक शेतकरी व सर्व सामान्य जनतेची घरेदारे, विहीर, पाइपलाइन, विंधन विहिरी, फळबागा, असे बाधित झालेले आहेत.त्यांच्या नुकसान भरपाईची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यासाठी ते प्रभारी प्रांताधिकारी यांच्याकडे हेलपाटे घालून बेजार झाले आहेत.
याशिवाय या कार्यालयाशी संबंधीत कुळ कायदा केसेस, सासवड माळी कारखान्याच्या केसेस, बिगरशेती व इतर परवाने अशी अनेक कामे खोळंबली असल्याने लोकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या कार्यालयास तातडीने कायमस्वरुपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी लोकांची गेली अनेक दिवसापासून मागणी आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सातत्याने अर्ज विनंत्या करून त्याचा पाठपुरावा केला.
पुण्याच्या आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार सोमवारी ५ डिसेंबर रोजी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जयसिंग देशमुख, किशोर जमदाडे, महेश फुटाणे, कुमार कांबळे, रफिक मुलाणी, गणेश मिसाळ उपस्थित होते. या आंदोलनाची दखल घेवून विभागीय आयुक्त कार्यालयातील कार्यरत उपजिल्हाधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी प्रांत अधिकारी यांची नेमणूक मंत्रालय स्तरावरून केली जात असल्याचे सांगितले आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्याबाबत मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती किरण साठे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.